सभापती, उपसभापती निवडणुकीत शिवसेना ठरणार किंगमेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 11:18 AM2022-02-08T11:18:55+5:302022-02-08T11:24:32+5:30
तुमसर पंचायत समितीत एकूण २० जागा असून, भाजपला सर्वाधिक १० जागा येथे मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा, काँग्रेसला तीन जागा व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे.
मोहन भोयर
भंडारा : तुमसर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद कोणाला मिळणार याची चर्चा गत २० दिवसांपासून तालुक्यात रंगली आहे. येथे भाजपला सर्वाधिक १० जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस सहा, काँग्रेस तीन व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. बहुमतासाठी येथे अकरा जागा पाहिजे. एका जागेकरिता भाजपची येथे कसोटी लागणार आहे. समसमान मते पडल्यास येथील सभापती व उपसभापती हे ईश्वर चिठ्ठीने ठरण्याची अधिक शक्यता आहे.
तुमसर पंचायत समितीत एकूण २० जागा असून, भाजपला सर्वाधिक १० जागा येथे मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा, काँग्रेसला तीन जागा व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. सभापती व उपसभापती पद हस्तगत करण्यासाठी अकरा मताची आवश्यकता आहे. भाजपने शिवसेनेला आपल्या सोबत घेतले तर सहज येथे त्यांचा सभापती, उपसभापती निवडून येऊ शकतो. परंतु, महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युला ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेस सहा, काँग्रेस तीन व शिवसेना एक असे अंकगणित जोडले तर तेही दहा होतात. स्पष्ट बहुमतासाठी अकरा मते आवश्यक आहेत. त्यामुळे येथे ईश्वर चिठ्ठीने तुमसर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद मिळण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे येथील शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेचा निर्णय वरिष्ठ शिवसेनेचे नेते घेणार असल्याचे समजते.
शिवसेनेला मिळणार उपसभापती पद
शिवसेना सध्या किंगमेकरच्या भूमिकेत असल्यामुळे शिवसेनेला येथे उपसभापतिपदी मिळण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरण तुमसर पंचायत समितीचा निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे. भाजपकडून सभापती पदाकरिता चंद्रशेखर (नंदू) रहांगडाले, लक्ष्मीकांत सेलोकर व पल्लवी कटरे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिराचंद मुरामकर, मनोज झुरमुरे, मीनाक्षी सहारे यांची नावे चर्चेत असून, पंचायत समिती निवडणुकीत हट्ट्रिक करणार आहे. काँग्रेसचे हिरालाल नागपुरे यांचेही नाव चर्चेत आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतरच सभापती पदी कोण विराजमान होणार हे समोर येईल. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने येथे अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत.