शिवसेनेच्या आंदोलनाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:32 AM2017-12-19T00:32:24+5:302017-12-19T00:32:42+5:30
तुमसर तालुक्यातील सितासांवगी येथील विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, निर्वाहभत्यात घोळ प्रकरणी महाविद्यालयात प्रशासकाची नियुक्ती करावी,...
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तुमसर तालुक्यातील सितासांवगी येथील विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, निर्वाहभत्यात घोळ प्रकरणी महाविद्यालयात प्रशासकाची नियुक्ती करावी, या मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको करण्याची तयारी सुरु असतानाच अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी केली.
सीतासावंगी येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात सत्र २००९-२०१० पासून २०१५-२०१६ पर्यंत संस्थेने निर्वाहभत्ता जमा केला नाही. याप्रकरणी माहिती आयोग खंडपीठ नागपूर येथे दोनवेळा सुनावणी झाली. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या भोजनाकरिता खर्च केल्याचे महाविद्यालयाकडून सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत संस्थेची चौकशी करून अहवाल मागवून संबंधित विभागाला दिला. मात्र समाजकल्याण विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारला शिवसैनिक आंदोलनस्थळी जमा झाले. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले विश्रामगृहात असताना समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी त्यांची भेट घेतली. संस्थेच्या तपासणीसाठी प्रादेशिक स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली. या समितीचा अहवाल मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न -प्राचार्य
मागील दीड वर्षांपासून स्वामीविवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजला राजकीय स्वार्थापोटी प्रसिध्दी मिळविण्यासाठी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन संस्था बंद पडून ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. राजेंद्र पटले यांच्या त्रासापासून न्याय न मिळाल्यास संस्थेतील ६५ कर्मचारी कुटूंबासह समाजकल्याण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करतील असा इशारा प्राचार्य एन. के. डहरवाल यांनी पत्रपरिषदेतून दिला.
चौकशी समिती गठित
सन २००९-१० ते २०१५-१६ पर्यत विद्यावेतन निर्वाह भत्त्याची रक्कम जमा झाली किंवा नाही, याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी गठीत करण्याचे आदेश समाज कल्याण विभाग नागपुरचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी दिला आहे. या समितीत समितीप्रमुख लेखाधिकारी संजय बोंडे, सदस्य अरविंद मोहोड व दिवाकर वदन यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करुन आठवडाभरात अहवाल सादर करतील, असा आदेश डॉ. गायकवाड यांनी दिला.