तुमसरात शिवसेनेचे धरणे दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:24+5:302021-06-11T04:24:24+5:30
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना डॉ. कोडवानी कोविड केअर सेंटर खासगी रुग्णालयाने शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केली, ...
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना डॉ. कोडवानी कोविड केअर सेंटर खासगी रुग्णालयाने शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केली, अशी तक्रार स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. डॉ. गोविंद कोडवानी यांनी स्वतः रुग्णालयात सांगितले की, कोरोना संसर्गजन्य काळात आमच्या रुग्णालयाकडून आठ हजार रुग्णांवर उपचार करून सदर रुग्णांना रिकव्हर अर्थातच दुरुस्त केल्याचे सांगितले आहे. एकूणच रुग्णालयाकडून याबाबत जनतेची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
कोविड रुग्णांच्या वाढीव बिलासंदर्भात मागील काही दिवसापासून शिवसेनेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. ही लुबाडणूक तात्काळ थांबविण्यात यावी. सदरप्रकरणी रुग्णालयाची चौकशी करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना पत्र सादर केले होते. परंतु, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या तक्रारीबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापही केली नसल्यामुळे शिवसेनेने नियोजन धरणे आंदोलन ९ जून बुधवारपासून सुरू केले आहे. नियमाची पायमल्ली करून जनतेची होणारी लुबाडणूक रोखण्याच्या संदर्भाने शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे.
सदर आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी आमदार राजू कारेमोरे यांनी आंदोलनस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला. तसेच सामाजिक संस्था लॉयन्स क्लबचे अध्यक्ष मनोज उकरे यांनी पत्र लिहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी शिवसेनेचे अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, शाखा प्रमुख निखील कटारे, तुषार लांजेवार, अरुण डांगरे, सुनील श्रावणकर उपस्थित होते.