भंडारातील अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध शिवसेनेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:36 AM2018-12-07T00:36:42+5:302018-12-07T00:37:33+5:30
शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे. प्रशासन अतिक्रमण हटविण्यावर ठाम राहिल्यास धरणे, मुंंडण आंदोलन आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिमांचे दहन करण्याचा इशारा येथे विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.
भंडारा शहरात बहुतांश रस्त्यावर गोरगरीब आपले व्यवसाय थाटून संसार चालवित आहेत. आता त्यांच्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत आहे. व्यवसायीकांना कोणत्याही नोटीस न देता रिक्षांमध्ये ध्वनीक्षेपक लावून दंवडी पिटली जात आहे. यामुळे व्यवसायीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील ही अतिक्रमण हटविण्याची चवथी कारवाई होय. यापुर्वीही प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र पंधरा ते वीस दिवसातच जैसे थे स्थिती झाली. अतिक्रमणावर कायम स्वरुपी तोडगा म्हणजे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना कायमस्वरुपी जागा देणे होय. मात्र प्रशासन तशा कोणत्याही उपाययोजना न करता थेट गरीबांचे दुकान उद्ध्वस्त करतात. आता या विरुध्द शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध करण्यासाठी शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी शिवसेनेच्यावतीने लाल बहादुर शास्त्री चौक, महात्मा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, मुस्लीम लायब्ररी चौक या चार ठिकाणी धरणे देण्यात येणार आहेत. यानंतरही प्रशासनाने योग्य भुमिका घेतली नाही तर १० डिसेंबर रोजी मुंडण आंदोलन करण्यात येईल. तसेच ११ डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढू. लोक प्रतिनिधीच्या प्रतिमेचे दहन केले जाईल असे सांगितले. या पत्रपरिषदेला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, अॅड. रवी वाढई, सुरेश धुर्वे, संजय रेहपाडे यांच्यासह फुटपाथ शिवसेना संघटनेचे अध्यक्ष अख्तर बेग मिर्झा आदी उपस्थित होते.
महिला रुग्णालयाची जागा हडपण्याचा डाव
जिल्हा महिला रुग्णालयाकरिता टोकण निधीची तरतुद करुनही बांधकामासाठी हेतूपुरस्सर विलंब केला जात आहे. रुग्णलयाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आपण या रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सध्या ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. पंरतु रुग्णालय बाधकामास चालढकल केली जात आहे. मुळातच रुग्णालयाचे बांधकाम होऊ नये, असा प्रयत्न स्थानिक आमदारांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालयासाठी आरक्षित जागा एका भाजीमंडीच्या माध्यमातून हडपण्याचा डाव असून बांधकामाबाबत स्थानिक खासदार आणि आमदार उदासीन असल्याचे भोंडेकर यांनी यावेळी सांगितले.