थरकाप उडविणारे साप मित्रच!
By admin | Published: July 3, 2015 12:54 AM2015-07-03T00:54:54+5:302015-07-03T00:54:54+5:30
साप...! नुसते नाव काढले तरी अंगाचा थरकाप उडतो. कारण त्याचा एक डंक मनुष्यप्राण्याला पृथ्वीलोकातून स्वर्गलोकात पाठवू शकतो.
देवानंद नंदेश्वर भंडारा
साप...! नुसते नाव काढले तरी अंगाचा थरकाप उडतो. कारण त्याचा एक डंक मनुष्यप्राण्याला पृथ्वीलोकातून स्वर्गलोकात पाठवू शकतो. अर्थात तो साप विषारी असेल तर, पण किती आणि कोणते साप विषारी असतात, याची माहिती जाणून न घेता आपण प्रत्येकच सापाला विषारी समजून घाबरत असतो. वास्तविकता मात्र वेगळीच आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या सापांबद्दलची योग्य माहिती जाणून घेतली आणि त्यानुसार सापांबद्दलचे गैरसमज दूर केल्यास निसर्गाचा समतोल राखणारे साप आपले मित्रच असल्याचे पटल्याशिवाय राहणार नाही.
नागपंचमीला ज्या सापांची पूजा केली जाते त्याच सापांना इतर दिवशी नजरेस पडताच निर्दयीपणे मारले जाते. यामुळे दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत आहे. मात्र भंडारा^^-गोंदिया जिल्ह्यासारख्या जंगलांचे आणि शेतात बांध्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या भागात बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या जातींचे साप आढळतात. विषारी सापांमध्ये प्रामुख्याने मण्यार/दांडेकार (कॉमन क्रेट), नाग (स्पेक्टॅकल्ड कोब्रा), घोणस (टवऱ्या), पटेरी मण्यार किंवा आग्या मण्यार (सतरंगी साप), तणसर्प किंवा चापडा (बांबू पिटवायपर), फुरसे (सॉ स्केल्डवाईपर) या सहा प्रकारच्या सापांचा समावेश आहे.
निम्नविषारी सापांमध्ये वाईन स्नेक (हरणटोळ), मांजऱ्या, फोर्स्टेन मांजऱ्या हे साप आढळतात. या सापांनी चावा घेतला तरी माणूस मरत नाही, केवळ गुंगी येते. याशिवाय अजगर, धामण, डुरक्या घोणस (मांडवळ), पाणदिवट (धोंड्या), विरोळा (तास्या), नानेटी (वास्या), गवत्या, धुळ नागीन, तस्कर, रूखई (वेल्या), कवड्या, पटेरी कवड्या, कुकरी, रातसर्प पोवळा हे पूर्णपणे बिनविषारी साप राज्यभरात सर्वत्र आढळतात. उन्हाळ्यात बिळात राहणारे साप पावसाळा लागला की संवेदनशील होऊन बाहेर पडतात. हाच त्यांचा प्रजननाचा काळ असतो. साधारण जून-जुलै महिन्यात नाग, मण्यार हे विषारी साप जास्त दिसतात. विषारी सापांमधील विषाचे दोन प्रकार आहेत.
त्यापैकी न्युरोटॉक्सिक व्हेनम हे विष मण्यार, पटेरी मण्यार, नाग या सापांमध्ये आढळते. हे विष शरीराच्या ‘सेंट्रल नर्व्हस सिस्टम’वर आघात करते. त्यामुळे हृदय, मेंदू काम करीत नाही आणि मनुष्याचा मृत्यू ओढवतो. हिमोटॉक्सिक व्हेनम हे विष घोणस (टवऱ्या), बांबू पिटवायपर (तणसर्प किंवा चापडा), सॉ स्केल्डवाईपर (फुरसे) या सापांमध्ये असते. हे विष रक्तातील पेशी खराब करते, रक्ताचे पाणी बनविते. त्यामुळे रक्तातून आॅक्सिजनचा पुरवठा होणे बंद होते आणि रुग्णाचा मृत्यू ओढवतो. ‘पॉलिव्हॅलंट’ ही विषविरोधक लस दोन्ही प्रकारच्या सर्पदंशावर गुणकारी आहे. मात्र जेव्हा पॉलिव्हॅलंट लस काम करीत नाही किंवा विषाची मात्रा जास्त झाली असते तेव्हा मोनोव्हॅलंट ही विषविरोधक लस वापरली जाते. ही लस महागडी आहे आणि कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बहुतांश सरकारी रुग्णालयांमध्ये ‘मोनोव्हॅलंट’हीच लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला प्राण गमवावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये पॉलीव्हॅलंट लस उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सर्पदंश झाल्यास रुग्णाला तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी केले. विषारी साप बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यांची योग्य ओळख करून घेऊन त्याप्रमाणे योग्य उपचार घेतल्यास विषारी सापाच्या दंशानंतरही जीव वाचू शकतो. मात्र लोक मांत्रिक-वैद्याकडे जाऊन उपचार घेण्यात वेळ घालवतात. जिल्ह्यात निसर्ग मित्र मंडळाच्या माध्यमातून सावन बहेकारसारखे निसर्गप्रेमी सापांबद्दल जनजागृती करीत आहेत. पण या कामासाठी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. जनजागृतीसाठी कधी सरकारी यंत्रणेनेसुद्धा पुढाकार घेतला नाही. त्यामुळे नाही म्हणता म्हणता दरवर्षी सर्पदंशातून राज्यात शेकडो जणांना बळी पडावे लागत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सापांना सरसकट जीवानिशी मारणे हा त्यांच्यापासून वाचण्याचा उपाय नाही. त्यासाठी सर्पमित्रांशी संपर्क साधावा. सापांबद्दलचे गैरसमज दूर करून शालेय विद्यार्थ्यांपासून तर अशिक्षितांना याबाबतचे ज्ञान वेगवेगळ्या माध्यमातून देणे हाच त्यावर योग्य उपाय ठरू शकतो, असे सर्पमित्रांना वाटते.
‘धामण’बद्दलचे गैरसमज
जमिनीवर आणि झाडावर राहणारा धामण हा सर्वात चपळ साप आहे, हे खरे आहे. मात्र हा साप शेपूट मारतो, त्याच्या शेपटीत काटा असतो. तो मारला की पाय सडतो आणि नंतर शरीर खराब होऊन मनुष्य मरतो, असे गैरसमज या सापाच्या बाबतीत आहेत. वास्तविक असे काहीही नाही. धामणच्या शेपटीत काटाच नसतो. त्याने चावा घेतला तरी काही फरक पडत नाही कारण तो बिनविषारी साप आहे. सर्वाधिक प्रमाणात उंदीर खाणारा हा साप शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे, असे सर्पमित्र सांगतात.
मांत्रिक-वैदुंचे असे फावते
सर्वत्र दिसणाऱ्या एकूण सापांमध्ये बहुतांश साप हे बिनविषारीच असतात. पण कोणता साप विषारी आणि कोणता बिनविषारी याची माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक मांत्रिक-वैदूंकडे जातात. मुळात दंश केलेले ९० टक्के साप बिनविषारी असल्यामुळे मांत्रिक, जुडीबुटीवाले वैद्य आपला उपचार करून आपल्यामुळेच सापाचे विष उतरले, असा दावा करतात. नागरिकांचाही त्यांच्यावर विश्वास बसतो आणि त्यांची दुकानदारी वाढण्यास खतपाणी मिळते. मात्र एखाद्यावेळी विषारी साप दंश करतो आणि मांत्रिकाकडे गेलेल्या व्यक्तीला जीव गमवावा लागतो.
नागपंचमीची परंपरा
जिल्ह्यात नागपंचमीनिमित्त सर्व शेतकरी शेतातील काम बंद ठेवतात. सर्व ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते. यातच काही लोक सापांना दूध पाजतात. मात्र सापांना पाजलेले दूध त्याच्या फुफ्फुसात जाऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सापांना दूध पाजू नये, असे आवाहन सर्पमित्र करतात. काही आदिवासीबहुल भागात अंधश्रद्धेतून कोणाच्या अंगात नागदेवता येण्याचे प्रकारही घडतात.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत अॅन्टी स्रेक व्हेनम उपलब्ध
जिल्ह्यात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत एन्टी स्रेह व्हेनम (एएसव्ही) उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र ही लस लावताना डीपली लावावी लागते. त्यासाठीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असते. रूग्णालयात हलविण्याची गरज भासली तर उपाययोजना म्हणून १०८ क्रमांकाच्या अॅम्बुलंसमध्येही ही औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.रूग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासली तर ही सोय केवळ जिल्हा सामान्य रूग्णालयात असून त्याला येथे आणावे लागते. सर्पदंश झाल्यास शक्य तितक्या लवकर ही लस लावल्यास रूग्णाचे प्राण वाचू शकते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी सांगितले.
नागाने दंश केलेला रुग्णसुद्धा वाचू शकतो
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय तुमसर, साकोली व जिल्ह्यातील इतर ग्रामीण रूग्णालयांमध्ये एन्टी स्रेह व्हेनम उपलब्ध आहेत. ही लस उपलब्ध नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. शासनाचे तसे निर्देशही आहेत. सर्पदंश झालेला व्यक्तीच नव्हे तर कोब्रा नागाने दंश केलेला व्यक्तीसुद्धा ही लस लावल्यामुळे वाचू शकतो. दंश झालेल्या व्यक्तीला त्वरित रूग्णालयात नेवून उपचार करून घ्यावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवंद्र पातुरकर यांनी सांगितले.
सापांपासून माणसाचा आणि माणसांपासून सापाचा जीव वाचविणे हा सर्पमित्रांचा उद्देश आहे. पण अलीकडे लोकांनी आम्हाला मनोरंजनाचे साधन करून टाकले आहे. साप पकडण्यासाठी आम्हाला बोलविले जाते आणि लोक मजा पाहत असतात. यापेक्षा प्रत्येकात सापाबद्दल जागृती यावी, अशी आमची इच्छा आहे. शासनानेही त्यासाठी पुढाकार घेत एनजीओंमार्फत यासाठी अभियान राबविले पाहिजे. यातून सापांचा आणि मनुष्यांचाही जीव वाचू शकेल.
- अशोक गायधने
ग्रीन फ्रेन्डस नेचर क्लब, लाखनी