पालांदुरात शिवजन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:05 AM2019-02-22T01:05:58+5:302019-02-22T01:06:30+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या.
सर्व धर्म समभावाचा आदर करणाऱ्या पालांदुरमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल होती. शिवनेरी किल्ल्याला साजेसा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. पालांदूरच्या इतिहासात ही अभिनव घटना ठरली. ढोलताशांचा गरज, फटाक्यांच्या आतिशबाजीत महारॅली काढण्यात आली. दीड किलोमिटर लांबीच्या या महारॅलीत अश्वारुढ शिवराय, मावळे, नववारी लुगडे परिधान केलेल्या तरुणी यांच्यासह जिल्हा परिषद विद्यालय, गोविंद विद्यालयाचे लेझीम पथक अशा गजरात ही रॅली काढण्यात आली. शिवाजींची वेशभूषा रजत मस्के यांनी साकारली होती. तो अश्वारुढ झाला तेव्हा साक्षात शिवाजी महाराजच घोड्यावर बसल्याचा भास होत होता.
सकाळी ९ वाजता राष्ट्रसंतांना नमन करून रुपेश महाराज यांचे शिवकीर्तन पार पडले. प्रेमदास गोटेफोडे यांनी त्यांना सहकार्य केले. सायंकाळी ५ वाजता शिवव्याख्यानकर्ते प्रा.ज्ञानेश वाकुडकर व अमोल ठाकरे यांनी शिवमहिमा सांगितली. त्यावेळी प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहिला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य रोहित प्रधान, विजय कापसे, उपसरपंच पिंटू खंडाईत, माजी सरपंच राजेश इसापुरे उपस्थित होते. या व्याख्यानानंतर शाळेच्या मुलामुलींचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. संचालन प्रिती नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक शीतल खंडाईत यांनी केले. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात कवलेवाडा, मेंगापूर, पालांदूर यांच्यासह गावातील शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते.