शिवसेनेच्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:50 PM2017-09-20T22:50:52+5:302017-09-20T22:51:20+5:30
वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन यासह अन्य मुद्यांना घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला जिल्हास्तरातून संमिश्र प्रतिसाद लाभला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन यासह अन्य मुद्यांना घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला जिल्हास्तरातून संमिश्र प्रतिसाद लाभला. यात तुमसर येथे काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच अन्य तालुक्यातूनही प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण भागात जवळपास १६ तासांपेक्षा जास्त भारनियमन सुरु आहे. याचा परिणाम विशेषत: शेतकºयांना बसत असून ऐन सिंचनाच्या वेळी वीज बंद असल्याने धानाला पाणी कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे.
वाढत्या महागाईवर शासनाला नियंत्रण आणता आले नाही. उर्जामंत्र्यांनी जिल्ह्याला २४ तास वीज पुरवठा करू अशी घोषणा केली होती. ती घोषणा हवेत विरली असून दुसरीकडे जीवघेणे भारनियमन सुरु आहे.
याच मुख्य मागणीला घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी बुधवारी जिल्हा बंदची घोषणा केली होती. याला जिल्हाभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने व शाळा सुरूच होती.
यात तुमसर येथे चांगला तर भंडारा, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, साकोली व पवनी येथे अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठाने सुरु होती. तुमसरात मात्र सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. त्यानंतर हळूहळू स्थिती सामान्य होत गेली. भंडारा शहरात शिवसेनेच्या वतीने रॅली काढण्यात येऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, दीपक शेंद्रे, सुधाकर कारेमोरे, संजय रेहपाडे, विजय काटेखाये, संदीप वाकडे, अमीत मेश्राम, नरेश उचिबगले, अनिल गायधने, पवन चौव्हाण,राजू ंब्राम्हणकर, किशोर चन्ने, सूर्यकांत इलमे, भरत वंजारी, अरविंद बनकर, मनोज देशमुख, दिलीप सिंगाडे, अॅड.रवी वाढई, उमेश देशमुख, महेश पटले, दिनेश पांडे, कृपाशंकर डहरवाल यासह शेकडो शिवसैनिक यावेळी सहभागी झाले होते.