धक्कादायक! अल्पवयीन मुलीला घरात डांबून पाच युवकांकडून दोन दिवस अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 06:17 PM2023-07-14T18:17:13+5:302023-07-14T18:20:32+5:30
१८ दिवसांनंतर झाली तक्रार : पोक्सो अंतर्गत पाचही युवकांना अटक
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : आईवडील डान्स क्लास लावण्यास नकार देत असल्याने रागाने घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला बसस्थानकावर गाठून फूस लावू नेले. नंतर तिच्यावर पाच जणांनी दोन दिवस सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण भंडारा शहरात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पवन निखार (२५), हितेश निनावे (२६), करण खेताडे (२६), रॉनी कोटांगले (२८) आणि नितेश भोयर (३०) या पाचही युवकांना अटक केली आहे.
ही घटना २७ जूनची असली तरी तक्रार मात्र १३ जुलैला झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात घरून निघून आलेली ही अल्पवयीन मुलगी भंडारा बस स्थानकावर बसून होती. दरम्यान, दोन तरुणांनी तिच्याजवळ येऊन विचारपूस केली. गप्पा मारायला सुरूवात केली. गप्पांच्या नादात तिला कोरंभी येथे फिरायला नेले. त्यानंतर या दोघांनी तिला त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या घरी नेले. नंतर पुन्हा तेथे दोन मित्रांना बोलावून घेतले. हा प्रकार पाहून मुलीने त्यांना तिला बसस्थानकावर सोडून देण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या नकारानंतरही त्यांनी बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
रात्रभर सोबत घालविल्यावर दुसऱ्या दिवशी (२८ जून) सकाळी ७ वाजता दोन आरोपींनी तिला बस स्थानकावर परत सोडून दिले. ती तिथेच बसली असताना पुन्हा दोन आरोपी तिच्याकडे आले. जेवण कर, भूक लागली असेल, असे सांगून तिला मित्राच्या रूमवर नेले. जेवणानंतर दोघांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी तिला बस स्थानकावर सोडून दिले. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे तिने जिल्हा रुग्णालयात रात्र काढली.
गावी गेल्यावर तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर गुरूवारी तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही जणांना अटक केली. १५ जुलैपर्यंत त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उप निरीक्षक गौरी उईके यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे