धक्कादायक! रेती तस्करांनी पोखरले बावनथडी नदीपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:41+5:30
तुमसर तालुक्यात बावनथडी नदीचे पात्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असून, मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. यात चांदमारा, आष्टी, चिखली, देवनारा, लोभी, पाथरी या रेती घाटांचा समावेश आहे. यापैकी राज्य शासनाने एकाही रेती घाटाचा लिलाव दीड वर्षापासून केला नाही. परंतु, राजरोसपणे या रेती घटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. संघटनात्मक पद्धतीने रेतीची सर्रास चोरी सुरू आहे. यापूर्वी या रेती घाटांचा लाखो रुपयांत रेती घाट लिलाव करण्यात आले होते.
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरराज्य बावनथडी नदीवरील आठ रेती घाट रेती तस्करांचे पोखरणे सुरू आहे. नदीपात्राच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पडत आहे. लाखोंचा महसूल तर बुडत आहे. सोबतच नदीच्या अस्तित्वाला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटांचीही अशीच स्थिती आहे.
तुमसर तालुक्यात बावनथडी नदीचे पात्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असून, मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. यात चांदमारा, आष्टी, चिखली, देवनारा, लोभी, पाथरी या रेती घाटांचा समावेश आहे. यापैकी राज्य शासनाने एकाही रेती घाटाचा लिलाव दीड वर्षापासून केला नाही. परंतु, राजरोसपणे या रेती घटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. संघटनात्मक पद्धतीने रेतीची सर्रास चोरी सुरू आहे. यापूर्वी या रेती घाटांचा लाखो रुपयांत रेती घाट लिलाव करण्यात आले होते.
मध्यप्रदेशातून उगम पावणाऱ्या बावनथडीचे पात्र विस्तीर्ण आहे. या नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती उपलब्ध आहे. बेसुमार रेती उपशामुळे अनेक ठिकाणी झुडपी वनस्पती उगवली आहे.
नदीपात्रात सर्वत्र खड्डेच खड्डे दृष्टीस पडतात. मध्यप्रदेश शासनाने या नदीपात्रातील अनेक घटांचे लिलाव केले आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. परंतु, रेती चोरी मात्र सर्रास सुरू आहे. तालुक्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून आहे. लेंडेझरी मार्गाने थेट हिवरा बाजार, रामटेक येथे हा रस्ता जातो. चोरीची रेती याच मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. महसूल आणि पोलिस मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.
कोतवाल, तलाठ्याकडे संरक्षणाची जबाबदारी
- रेती चोरी होऊ नये त्यासाठी रेती घाट संरक्षणाची जबाबदारी स्थानिक कोतवाल व तलाठ्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतु, कोरोना संक्रमण काळात कोतवाल व तलाठ्यांना विविध कामे करायची आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा प्रभार आहे. त्यातच त्यांना माहिती गोळा करणे, त्याची ऑनलाइन माहिती शासनाला पाठविणे आदी कामे करावी लागतात. त्यामुळे रेती घाटांचे संरक्षण करण्याकरिता त्यांनाही मर्यादा येथे येत आहे.
पर्यावरणाची हानी
- रेती घाट लिलाव करत असताना खनिकर्म विभाग व महसूल विभाग पर्यावरणाची हानी होणार नाही, या दृष्टिकोनातून अहवाल मागवून त्यानंतर लिलाव करण्यात येतो. नियमानुसार पर्यावरणाची हानी होऊ नये, हा येथे नियम आहे. दुसरीकडे रेती तस्करांचे मात्र येथे राजरोसपणे संपूर्ण नदीपात्र पोखरणे सर्रास सुरूच आहे. यामुळे पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. बावनथडी नदीवर धरण बांधले असल्याने वर्षातून किमान नऊ महिने ही नदी कोरडी राहते. त्या कारणामुळे रेती तस्करांचे येथे चांगभले होते.