धक्कादायक! मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी पोखरले बावनथडी व वैनगंगेचे नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 08:00 AM2023-04-28T08:00:00+5:302023-04-28T08:00:06+5:30

Bhandara News भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या बावनथडी आणि वैनगंगा या दोन्ही नद्यांचे मागील काही वर्षांपासून रेती तस्करामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Shocking! Sand smugglers in Madhya Pradesh have polluted the riverbeds of Bavanthadi and Vaingange | धक्कादायक! मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी पोखरले बावनथडी व वैनगंगेचे नदीपात्र

धक्कादायक! मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी पोखरले बावनथडी व वैनगंगेचे नदीपात्र

googlenewsNext

मोहन भोयर

भंडारा : तुमसर तालुक्याच्या सीमेतून बावनथडी आणि वैनगंगा या दोन मोठ्या नद्या वाहतात. सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचा प्रवास या दोन्ही नद्या तालुक्यातून करतात. जीवनदायिनी ठरलेल्या या दोन्ही नद्यांचे मागील काही वर्षांपासून रेती तस्करामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे. रेती तस्करांनी पात्रातून बेसुमार रेतीचा उपसा केला आहे. अक्षरश: नदीपात्र पोखरून टाकले असल्याने दोन्ही नद्यांचे पात्र सध्या पठारासारखे दिसत आहे. परिणामत: नदीपात्रात केवळ खड्डे व खुरट्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हा प्रकार असाच चालत राहिला तर भविष्यात या दोन्ही नद्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमसर तालुक्याला तथा जिल्ह्याला वरदान ठरलेली वैनगंगा व बावनथडी या दोन्ही नद्या आपल्या अस्तित्वाकरिता संघर्ष करत असल्याचे या दोन्ही नद्यांच्या नदीपात्राकडे बघितल्यावर दिसते. तुमसरचा तालुक्यातील सोंड्या व इतर अन्य गावाजवळून वाहणाऱ्या या नद्यांचे पात्र सध्या पोखरलेले दिसत आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमा या दोन्ही नद्यांनी विभाजल्या गेल्या आहेत. दोन्ही राज्यांची मालकी या नद्यांवर असून रेती घाटांच्या लिलाव येथे दोन्ही राज्य करतात. मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या हद्दीत येथील नदी घाटांचे लिलाव बंद आहेत; परंतु, दुसरीकडे मध्य प्रदेशाने आपल्या सीमेतील सर्वच रेती गटांचा लिलाव केला आहे.

रेती तस्करांचे साटेलोटे

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील रेती तस्करांचे साटेलोटे येथे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. दोन्ही राज्यातील रेती तस्कर मिळून रेतीचा उपसा करीत असल्याचे धक्कादायक माहिती आहे. नदीपात्रात महाराष्ट्राच्या सीमेतील गावामधील ट्रॅक्टर रेती वाहून नेतात, यावरून रेती तस्करांचे संबंध उघड दिसतात. दोन्ही राज्यातील रेती तस्करांचे राजकारण्यांशी संबंध असल्याने कारवाई होत नाही. मध्य प्रदेशातील बालाघाट वारा शिवनी तर महाराष्ट्रातील तुमसर, भंडारा व नागपूर येथील तस्कर येथे मागील अनेक महिन्यांपासून सक्रिय आहेत.

रेती तस्कर आहेत दबंग

मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेत रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून त्यांचे मोठे येथे रॅकेट सक्रिय आहे. तस्कर श्रीमंत व दबंग आहेत, त्यामुळे त्यांच्यापुढे प्रशासनाने नांगी टाकलेली दिसून येत आहे. नेत्यांच्या आश्रयाने अर्थकारणाआड राजरोसपणे रेतीचा उपसा येथे सुरू आहे. दोन्ही नदीपात्रांवर सध्या माफियाराज असल्याने सर्वसामान्य तक्रारींच्या भानगडीत पडत नाही, हे सत्य आहे.

Web Title: Shocking! Sand smugglers in Madhya Pradesh have polluted the riverbeds of Bavanthadi and Vaingange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.