धक्कादायक! तुमसर तालुक्यातील रेतीला तिरोडाची रॉयल्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:29+5:302021-04-17T04:35:29+5:30
तुमसर : तुमसर तालुक्यातील एका रेती घाटातून उत्खनन केलेल्या रेतीला तिरोडा तालुक्यातील दुसऱ्या रेती घाटाची रॉयल्टी देण्याच्या धक्कादायक प्रकार ...
तुमसर : तुमसर तालुक्यातील एका रेती घाटातून उत्खनन केलेल्या रेतीला तिरोडा तालुक्यातील दुसऱ्या रेती घाटाची रॉयल्टी देण्याच्या धक्कादायक प्रकार सुरू आहेे. तालुक्यातील रेती घाटातील साठ्याची लूट सुरू आहे. नदीपात्रातील सीमांकनाबाहेरूनही रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती आहे.
तुमसर व तिरोडा तालुक्याला दोन्ही रेती घाट समांतर आहेत. वैनगंगा नदीपात्राने दोन्ही तालुक्यांचा सीमा येथे निश्चित केल्या आहेत हे विशेष. शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील एका रेती घाटाचा शासनाने लिलाव केला आहे. त्या रेती घाटाला समांतर दुसरा रेती घाट तिरोडा तालुक्यातील आहे. दोन्ही रेती घाटांचा लिलाव झाला आहे. नदीपात्रातील सीमांकन शासनाने केले आहे. परंतु सीमांकनाबाहेरून रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील रेतीचा दर प्रतिब्रास तीन हजार रुपये असून तिरोडा तालुक्यातील लिलाव झालेल्या रेती घाटाच्या रेतीचा दर प्रतिब्रास १६०० रुपये आहे. तुमसर तालुक्यातील नदीपात्रातील रेतीला तिरोडा तालुक्यातील रॉयल्टी देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुमसर तालुक्यातील नदी घाटातील रेती साठा कागदोपत्री ‘ जैसे थे’च राहून वास्तविक नदीपात्रातील रेतीचे उत्खनन केले जात आहे.
बॉक्स
गुणवत्तापूर्ण रेतीमुळे तस्करी जोमात
तुमसर तालुक्यातील हा रेती घाट एक कोटी ८२ लाखांत लिलाव करण्यात आला. यात आठ हजार ब्रास रेती उत्खननाची परवानगी मिळालेली आहे. या घाटातील रेती ही पांढरी शुभ्र व गुणवत्तापूर्ण असल्याने या रेती घाटावर मोठ्या प्रमाणात ट्रक रेतीसाठी येतात. तसेच या रेती घाटाचे अंतरही कमी पडते. तर दुसरीकडे तिरोडा तालुक्यातील घाटाचे अंतर जास्त असून, रेती मातीमिश्रित पाखन असल्याने तिची मागणी कमी आहे. सध्या महसूल प्रशासन कोरोना संक्रमणाला थोपविण्याकरिता व्यस्त आहे. त्यामुळे रेती प्रकरणाकडे सध्या दुर्लक्ष होत आहे.
तुमसर तालुक्यातील रेती घाटावर चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्यांना पाठवून या प्रकाराची खातरजमा करण्यात येईल. नियमबाह्य रॉयल्टी आढळल्यास नक्कीच संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
बाळासाहेब तेळे, तहसीलदार, तुमसर