‘घरपोच’ योजनेविषयी धान्य दुकानदारांत संभ्रम
By admin | Published: December 28, 2015 12:57 AM2015-12-28T00:57:01+5:302015-12-28T00:57:01+5:30
घरपोच योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून झाला. परंतु योजनेत नमूद सुविधा आदी मिळत नसल्याने गोदामातील हमालांनी संप पुकारला होता.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : धान्य दुकानदारांनी मागितले मार्गदर्शन
तुमसर : घरपोच योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून झाला. परंतु योजनेत नमूद सुविधा आदी मिळत नसल्याने गोदामातील हमालांनी संप पुकारला होता. परिणामी वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती व दि. २२ डिसेंबरपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहचते झाले. मात्र अजूनही त्या योजनेतील उणिवा दुर झालेल्या नसल्याने डिसेंबर तर संपला आता पुढचे कसे यावर मार्गदर्शन व उपाय सुचविण्याकरिता स्वस्त भाव दुकानदारांनीच तहसिलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवून विचारणा केली आहे.
अन्य धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी म्हणून राज्य शासनाने घरपोच योजना अंमलात आणली व त्याचा पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये करण्यात आला परंतु योजनेत वाहनात धान्य चढविणाऱ्या हमालांना हमाली दुकानदाराकडून मिळणे बंद झाल्याने हमाल कामगारांनी संप पुकारुन काम बंद केले होते.
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी करुन हमालीचा प्रश्न हाताळला व हमाल कामगारांना हमाल कंत्राटदाराकडून मिळाणाऱ्या हमालीत वाढ करुन दिली व तृर्तास वितरण व्यवस्थेचा प्रश्न मिटला होता.परंतु त्या हमालांना जास्त हमाली देण्याचे आश्वासन देऊनही अजून पर्यंत त्यांना हमाली मिळालीच नाही.त्यामुळे हमालवर्गात नाराजी पसरली असून परत जानेवारीतही त्यांचे काम बंद होणार असल्याने अन्न-धान्य वितरण व्यवस्था प्रभावित होणार आहे.
परत ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागणार असल्याने जिल्ह्यातील स्वस्त भाव दुकानदारांनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून स्वस्त भाव दुकानदारांना येणाऱ्या अडचणी जसे धान्याची चालानद्वारे रक्कम भरल्यानंतर धान्य स्वस्त धान्य दुकानात किती दिवसात पोहचेल याची कालमर्यादा निश्चित करणे, गत डिसेंबर महिन्यात गोडावून मधून ट्रॅक्टरमध्ये धान्य मांडून देण्याची हमाली ही हमाल कंत्राटदाराकडून देण्यात आली त्याप्रमाणे दर महिन्याची ही हमाली हमाल कंत्राटदाराने द्यावी, धान्य स्वस्त धान्य दुकानात पोहोचल्यावर धान्य उतरविण्याची आगावू दोन ते तीन रुपये हमाली दुकानदाराकडून होणारी अवैध वसुली, धान्य दुकानात उतरवितांना माल मोजून मिळत नाही.
या योजनेच्या पुर्वी दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्याचा ७ तारखेपर्यंत पोहचविण्यात येत असे परंतु योजना सुरु होताच २२ तारखेपर्यंत धान्य दुकानात पोहचले तसेच या योजनेमार्फत आलेल्या प्रत्येक स्वस्त भाव दुकानदाराला प्रत्येक कट्यात १ ते ३ किलो धान्य कमी मिळाला आहे. त्यावर दुकानदारांनी काय करावे व काय करु नये यावर उपाय व मार्गदर्शन करण्यासंबंधीचे निवेदन राष्ट्रीय ग्राहक दिनी तहसिलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले.
यावेळी स्वस्त भाव दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे, शालीकराम गौरकर, गुलराजमल कुंदवानी, सुनील मेश्राम, भुपत सार्वे, प्रमोद घरडे व असंख्य स्वस्तधान्य दुकानदार होते. ज्याप्रमाणे रॉकेल वितरण प्रणाली ही घरपोच करण्यात आली त्याच धर्तीवर अन्य धान्य घरपोच का सुरु होवू शकते परंतु या घरपोच योजनेत सुस्पष्टता नसल्याने व अधिकाऱ्यांनीच अर्थाचे अनर्थ काढून योजना क्लिल्ट करित आहे. याचा फटका स्वस्त धान्य दुकानदारानेच का सहन करावा असाही सवाल उपस्थित झाल्याने जानेवारी महिन्यात कधी स्वस्त धान्य ग्रामीण भागात पोहचून वितरीत होणार हे सांगणे जरा कठीणच झाले आहे. परंतु यामुळे ग्रामीण भागातील गरिब जनतेवर उपासमारीची पाळी नक्की येणार एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)