आता दुकाने राहणार रात्री 10 पर्यंत उघडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 05:00 AM2021-08-15T05:00:00+5:302021-08-15T05:00:20+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत ब्रेक दी चेन च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहे. उपहारगृह, खानावळ, हाॅटेल, बार हे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहण्यास मुभा देण्यात आली आहे. यात प्रथमदर्शनी भागात काेविड नियमांचे पालन करणारे सूचना फलकावर लिहणे बंधनकारक आहे. या आस्थापनेत काम करणारे सर्वच प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे बंधनकारक आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर तसेच जिल्हा काेराेनामुक्तीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने अधिक वाव देत सर्वच प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंत सुरु ठेवता येतील असे आदेश निर्गमित केले आहे. मात्र सिनेमागृह व धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत ब्रेक दी चेन च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहे. उपहारगृह, खानावळ, हाॅटेल, बार हे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहण्यास मुभा देण्यात आली आहे. यात प्रथमदर्शनी भागात काेविड नियमांचे पालन करणारे सूचना फलकावर लिहणे बंधनकारक आहे. या आस्थापनेत काम करणारे सर्वच प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे बंधनकारक आहे. पार्सल सुविधा मात्र २४ तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची प्रतिष्ठाने, दुकाने ही सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंत सुरु राहील. येथेही काेविड नियमांचे पालन हाेणे गरजेचे आहे. व्यापारी संकुलालाही हेच नियम लागू करण्यात आले आहे. जिम्नॅशियम, याेगा सेंटर, ब्युटीपार्लर, सलुन, स्पा हे सर्व दिवस रात्री १० वाजतापर्यंत ५० टक्के क्षमतेने उघडे राहतील.
इनडाेअर क्रीडा प्रकारांतर्गत खेळाडू व प्रशिक्षकांनी लसीकरणासाेबतच काेविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, बगीचे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार विहीत वेळेत सुरु राहतील.
राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, प्रचार सभा, रॅली, माेर्चे, वाढदिवस आदी कार्यक्रमास केंद्र शासनाने निर्देश दिलेल्या अंतर्गत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अथवा समुह यांनी साथराेग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन किंवा नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी त्रीसुत्री नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
लग्न साेहळ्यात २०० व्यक्तींना परवानगी
- लग्न समारंभ, विवाह साेहळे यासाठी कमाल २०० व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्यात आली आहे. खुल्या प्रांगणातील, लाॅन, बंधिस्त मंगल कार्यालय, हाॅटेल येथे आयाेजित लग्न समारंभात उपस्थित असलेल्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने काेराेना नियमांचे पालन करुन कार्यक्रम पार पाडता येईल. मात्र बंधिस्त मंगल कार्यालय, हाॅटेलमध्ये हाेणारे लग्नसमारंभ आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्तींच्या उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी असणार आहे.
धार्मिक स्थळांवर बंदी कायम
- ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने व्यापारी प्रतिष्ठाने साेमवार ते रविवार खुली केली असली तरी धार्मिक स्थळांवर बंदी कायम आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील सिनेमागृहेही बंद राहतील. आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना काेविड लसीकरण हाेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच लसीकरण पुर्ण न करणाऱ्या मात्र जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल साेबत असणे आवश्यक आहे.
शनिवारी आढळला एक काेराेनाबाधित
- जिल्ह्यात शनिवारी एक व्यक्ती काेराेनाबाधित आढळला. २९१ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळली. आतापर्यंत ६० हजार ७० व्यक्ती काेराेनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५८ हजार ९३६ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. तसेच काेराेनामुळे आतापर्यंत ११३३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात चार लक्ष ४३ हजार १३६ नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.११ टक्के असून मृत्यू दर ०१.८९ असा आहे.