एसटीच्या अल्प फेऱ्या, प्रतिसाद मात्र उदंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 05:00 AM2021-12-25T05:00:00+5:302021-12-25T05:00:03+5:30
शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातून १४ बसेस धावल्या. त्यात भंडारा आगाराच्या ११ आणि साकोली आगाराच्या तीन बसेसचा समावेश होता. भंडारा आगाराच्या ११ बसेसने दिवसभरात ४२ फेऱ्या करून १९५० प्रवाशांना आपल्या नियोजितस्थळी पोहोचविले. यातून महामंडळाला एक लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. साकोली आगाराच्या तीन बसेसलाही प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी नऊ बसेस धावल्या असून त्यांच्या जवळपास ३६ फेऱ्या झाल्याची माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर ठाम असले तरी भंडारा विभागातून अल्प फेऱ्या धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून नागपूर जाणारी बस प्रवाशांनी खचाखच भरून जाते. शुक्रवारी अडीच हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला असून महामंडळाला सुमारे दीड लाखांचे उत्पन्न झाले.
गत ५३ दिवसांपासून एस.टी. महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी घेऊन कर्मचारी संपावर अद्यापही ठाम आहे. निलंबन, बदल्या आणि राेजंदारी कर्मचारी सेवामुक्ती केल्यानंतरही कर्मचारी कामावर यायला तयार नाही. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार भंडारा विभागातील ४५ कर्मचारी दोन दिवसांत कामावर परतले. कामावर असलेल्या अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या भरोशावर काही बसफेऱ्या दोन आठवड्यांपासून काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातून १४ बसेस धावल्या. त्यात भंडारा आगाराच्या ११ आणि साकोली आगाराच्या तीन बसेसचा समावेश होता. भंडारा आगाराच्या ११ बसेसने दिवसभरात ४२ फेऱ्या करून १९५० प्रवाशांना आपल्या नियोजितस्थळी पोहोचविले. यातून महामंडळाला एक लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. साकोली आगाराच्या तीन बसेसलाही प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी नऊ बसेस धावल्या असून त्यांच्या जवळपास ३६ फेऱ्या झाल्याची माहिती देण्यात आली.
गत ५३ दिवसापासून संप सुरू असल्याने भंडारा विभागातील बससेवा जवळपास ठप्प झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही महामंडळाचे अधिकारी काही फेऱ्यांचे नियोजन करीत आहेत. भंडारा-नागपूर, साकोली, गोंदिया, पवनी अशा बसफेऱ्या निघत आहेत. खासगी वाहन धारकांकडून लूट होत असल्याने अनेक प्रवासी प्रथम बसस्थानकावर येवून बस कितीवेळात आहे याची चौकशी करतात. बस असेल तर सर्वप्रथम एसटी बसलाच प्राधान्य देतात.
संपकाळात भंडारा बसस्थानका समोर अवैध प्रवासी वाहतुकदारांनी ठिय्या मांडला आहे. रस्त्याच्या मधोमध आपली मोठाली वाहने उभे करून प्रवाशांना जोर जोराने ओरडून बोलावित आहेत.
नऊ जणांना कारणे दाखवा नोटीस
- विविध आवाहन केल्यानंतरही एसटीचे कर्मचारी कामावर यायला तयार नाही. अशा स्थितीत महामंडळाने आता कडक धोरण स्विकारले आहे. शनिवारी तुमसर आगारातील नऊ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता हे कर्मचारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
संपात असलेल्या परंतु महामंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. असे कर्मचारी कामावर येवू शकतात. कामावर आल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांनी आपल्यावर कारवाई होईल, असा गैरसमज करू नये.
-चंद्रकांत वडसकर, विभागीय वाहतूक अधिकारी.