सिल्ली येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:02+5:302021-06-04T04:27:02+5:30
भंडारा शहरापासून अवघ्या ६ किमीवर वसलेल्या सिल्ली गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी ...
भंडारा शहरापासून अवघ्या ६ किमीवर वसलेल्या सिल्ली गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी भर पडली आहे. सिल्ली गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली असल्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सिल्ली येथील बसस्थानक परिसरात सिंटेक्स टँक लावून त्या टँकमधून नळफिटिंग करून नळाद्वारे गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्याने सिल्ली येथील अर्धा गाव येथे पिण्याचे पाणी भरण्यासाठी एकाच ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. पाणी मिळण्यासाठी महिलांचे दररोज भांडणतंटे होत असून, ग्रामपंचायतीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. बोअरवेल असलेल्या परिसरात काही ठिकाणी खासगी विहिरी आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी महिलावर्गाने केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाणी व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे.