राइस मिलमध्ये कोंढ्याचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:41+5:302021-03-15T04:31:41+5:30
लाखांदूर : यंदाच्या खरिपात आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत धान भरडाईसाठी उचल आदेश होऊनही धान भरडाई थंडबस्त्यात असल्याने, तालुक्यातील राइस मिलमध्ये ...
लाखांदूर : यंदाच्या खरिपात आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत धान भरडाईसाठी उचल आदेश होऊनही धान भरडाई थंडबस्त्यात असल्याने, तालुक्यातील राइस मिलमध्ये कोंढ्याचा तुटवडा निर्माण होऊन वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडल्याची सर्वत्र बोंब आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तालुक्यात दरवर्षी नदीकाठावरील गावात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय केला जातो.
व्यवसायामुळे तालुक्यातील हजारो मजुरांना मजुरीचे कामही उपलब्ध केले जात आहे. त्यानुसार, लाखांदूर तालुक्यात यंदा शंभरहून अधिक वीटभट्टी व्यवसाय असल्याची माहिती आहे. मात्र, या व्यवसायांतर्गत वीटभट्टीत वीट निर्मितीसाठी इंधन म्हणून वापरल्या जाणारा कोंढा उपलब्ध होत नसल्याने, या व्यावसायिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या खरिपात तालुक्यात १४ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदीही झाली.
तथापि गत काही दिवस शासन स्तरावर राइस मिलर्सची मागणी प्रलंबित असल्याच्या चर्चेवरून यंदा या केंद्रांतर्गत धानाचे उचल आदेश उशिरा निर्गमित करण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, उचल आदेश निर्गमित होऊन काही कालावधी लोटला असतानाही तालुक्यात अद्यापही धान भरडाई थंडबस्त्यात असल्याने, राइस मिलमध्ये कोंढ्याचा तुटवडा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राईस मिलअंतर्गत आतापर्यंत केवळ खावटी साठी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई झाल्याने, राइस मिलमध्ये कोंढ्याचा अल्पसाठा उपलब्ध होत असल्याचे बोलले जात आहे. तथापि कोंढ्याचा अल्पसाठा असताना वीटभट्टी व्यावसायिकांकडून कोंढ्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, आपसूकच कोंढ्याचे भाव वधारल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या वर्षी तालुक्यात जवळपास साडेतीन हजार घरकुले बांधकाम मंजुर झाले असतांना सदर बांधकामासाठी आवश्यक विटा उपलब्ध होत नसल्याने, तसेही बांधकाम रखडल्याची ओरड आहे. तथापि काही वीटभट्टी व्यावसायिकांना चढ्या दराने कोंढा उपलब्ध झाल्याने विटांचे भावही वाढल्याची बोंब आहे.
या संपूर्ण परिस्थितीत उचल आदेशांतर्गत तालुक्यात जलदगतीने धान भरडाई होणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे. एकंदरीत तालुक्यात थंडबस्त्यात असलेल्या धान भरडाईमुळे निर्माण झालेल्या कोंढ्याच्या तुटवड्याने तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय तूर्तास संकटात सापडल्याचे बोलले जात आहे.