पालांदूर परिसरात युरिया खताची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:33 AM2021-03-28T04:33:49+5:302021-03-28T04:33:49+5:30
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर व परिसरात अधिकृत कृषी केंद्रात युरिया खताचा तुटवडा अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात ऑनलाईन रेकॉर्ड ...
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर व परिसरात अधिकृत कृषी केंद्रात युरिया खताचा तुटवडा अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात ऑनलाईन रेकॉर्ड युरिया दिसतो. परंतु प्रत्यक्षात निविष्ठा धारकांकडे युरिया नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
जिल्ह्यामध्ये १८ फेब्रुवारीला युरिया खताची आवक झाली होती. तेव्हापासून २७ मार्चपर्यंत युरियाची डिमांड असूनही युरिया कृषी निविष्ठा धारकांना मिळालेला नाही. त्यामुळे कृषी निविष्ठा धारक कंपन्यांकडे मागणी नोंदवून प्रतीक्षेत आहेत. खतांच्या किमती सुमारे २० टक्क्याने वाढण्याचे संकेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मार्चनंतर खत कंपन्या खताच्या पुरवठ्याची व्यवस्था लावण्याचे ऐकायला येत आहे. युरिया खत शेतकऱ्यांना थेट अनुदानावर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कमी रुपयात मिळत असलेला खत या हिशेबाने युरियाचा वापर अधिक करीत आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार कृषी निविष्ठा धारकांनी खत ऑनलाईन पद्धतीने विकणे बंधनकारक केले आहे. याकरिता प्रत्येक कृषी निविष्ठा धारकांना पॉस मशीन दिलेली आहे. शेतकरी वर्गाला खत खरेदी करताना आधार नंबर अत्यावश्यक आहे. परंतु शेतकरी वर्ग आधार क्रमांक न नेता कृषी केंद्रात खत खरेदी करतो. बहुतेक कृषी निविष्ठा धारक नियमित ग्राहक या नात्याने त्याला आधार नंबर विना पास मशीनचा उपयोग न करता फिजिकली, प्रत्यक्ष खत विक्री करतात.
भंडारा जिल्ह्यात वर्तमानात ऑनलाईन खत पंधराशे ते सोळाशे मेट्रिक टन इतका दिसतो. त्यामुळे जिल्ह्यात नेमका कोणत्या गावी व कोणत्या कृषी निविष्ठा धारकांकडे किती खत आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत याची नेमकी चौकशी होऊन शेतकरी वर्गाला न्याय मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.
कोट
तालुक्यातील कृषी निविष्ठा धारकांकडे युरिया खताच्या साठाबाबतीत सायंकाळपर्यंत माहिती घेतो. नेमकी काय अडचण आहे याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल.
पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.
पालांदूर येथील शेतकरी माझ्याकडे युरिया खतासाठी गत आठ दिवसापासून हजेरी लावीत आहेत. मी निर्धारित दराने २६६ रुपये त्यांना खताचा पुरवठा करीत आहे.
मुकेश देशमुख, देशमुख कृषी केंद्र, लोहारा