संपाचा प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:33 PM2018-06-08T23:33:19+5:302018-06-08T23:33:54+5:30
एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून पुकारलेल्या 'काम बंद' आंदोलनाला भंडारा विभागातील सहा आगारांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या अघोषित संपामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून पुकारलेल्या 'काम बंद' आंदोलनाला भंडारा विभागातील सहा आगारांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या अघोषित संपामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.
भंडारा विभागातील ८२७ फेऱ्यापैकी ६०५ फेऱ्या रद्द करण्यात आले असून ५६ हजार ७२२ किमी अंतर बसफेºया पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे भंडारा विभागाला शुक्रवारला जवळपास ३० लाख उत्पन्नाचा फटका बसला. अघोषित संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज कुठलीही कारवाई करण्यात आली नसून शनिवारला निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागातर्फे भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे़ यात भंडारा, गोेंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे एकूण सहा आगार आहेत़ या आगाराअंतर्गत एकूण ४३२ बसेस आहेत़ करारानुसार देण्यात येणारी वेतनवाढ ही मागणीपेक्षा कमी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. याबाबत एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकृत कामगार संघटनेने संपाची हाक दिलेली नाही. तरीही कामगारांनी स्वयंस्फूर्तीने काम बंद आंदोलन पुकारल्याची चर्चा आहे. 'कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस दिलेली नाही', असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
आगाऊ नोटीस दिल्याशिवाय अधिकृतपणे संप पुकारता येत नाही. त्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले असून परिवहन मंत्री यांच्या मनमानी विरोधात हा संप पुकारल्याचा संताप एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तुमसर, तिरोडा, भंडारा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गोंदिया, पवनी, साकोली आगरातील काही बसफेऱ्या सुरु होत्या.
गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता. यांचा फायदा खासगी बस वाहतूकरदारांनी घेतल्याचे चित्र बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले.