श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी
By Admin | Published: April 4, 2017 12:29 AM2017-04-04T00:29:10+5:302017-04-04T00:29:10+5:30
कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
आज निघणार शोभायात्रा : अड्याळ येथे घोडायात्रेचे आयोजन
भंडारा : कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता श्रीरामजन्मोत्सव सोहळा पार पडणार असून सायंकाळी ५ वाजता श्री बहिरंगेश्वर देवस्थानातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर व विविध देखावे या शोभायात्रेचे आकर्षण राहणार आहेत.
परंपरेनुसार शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री बहिरंगेशवर देवस्थान परिसरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात सकाळी ११ वाजतापासून श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम सुरू होईल. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव, त्यानंतर आरती व प्रसादाचे वितरण होईल. तत्पूर्वी सकाळी ग्रामरक्षक देवता आदिशक्ती शितला माता मंदिरातून सकाळी ७.३० वाजता दुचाकी रॅली काढण्यात येईल. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने श्री बहिरंगेश्वर देवस्थानातून अतिथींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात येईल. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय बीटीबी सब्जी भाजी असोसिएशनचे पदाधिकारी, हिंदू रक्षा मंच तथा शेतकऱ्यांच्या सहकार्याने सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक मुख्य शोभायात्रेत जलाराम चौकात येऊन सम्मिलित होईल. यात ४० कलावंतांचा सहभाग असलेला ढोल-ताशांचा पथक, गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले आदिवासी नृत्य, परमात्मा एक सेवक संमेलनाची झाकी, तथा कलाकुसर असलेला मध्यप्रदेशातील रथ हे या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. (प्रतिनिधी)
अड्याळ : एकता काय व कशी असते, त्यात भक्तीचा सुगंध जर अनुभवायचे झाल्यास अड्याळ येथील जागृत हनूमान मंदिर! श्रध्दा विश्वास यामुळे या मंदिरात यात्रेदरम्यान देशातील कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातील भक्तमंडळी या मंदिराची पवित्रता अनुभवाला आजही येताना दिसतात. आध्यात्मिक अनुभूती व शांतीसाठी प्रत्येकाला कुठेणा कुठे जात असतो. या यात्रेदरम्यान गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवसापासूनच हुमंत मंदिरात टाळ मृदुंगाचा गजर होतो. ढोलताशाच्या नादाने गाव दुमदुमून जातो. देवी-देवतांच्या नावाचा जयघोष सुरु होतो. चव्हाट्यावरचा शुकशुकाट मानसांनी गजबजून जातो. सर्वधर्मा समभावाचा संदेश देत हिंदू, मुस्लीम, बौध्द, शीख या भिन्न धर्माच्या पंथाच्या जातीचा लोकांना एकाच धाग्यात गुंफून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेले भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील घोडायात्रा, मनोकामना ज्योती कलश, श्रीरामजन्मोत्सव, श्रीमद्भागवत कथा, हनुमान जंयती आणि सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा लोकांनी लोकांकरिता उभारलेली लोकचळवळ ठरली आहे. यामुळे या उत्सवानिमित्त गावातील गल्लोगल्लीत भक्तीभावाचा सुगंध दरवळतांना दिसतो.
हनुमंताचे अड्याळ म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेल्या २० हजार लोकसंख्येच्या या तिर्थस्थळी गावता चार एप्रिल ते चैत्रपौर्णिमाच्या दिवशीपर्यंत म्हणजे ११ एप्रिल या काळात आगळे वेगळे चैतन्य राहणार आहेत. इंकापासून सर्वांपर्यंत प्रत्येक जण भौतीक अहंकाराची धूळ बाहेर काढून स्वयंसेवक यावृत्तीने कार्य करणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा जन्मोत्सव यावेळी कधी न पाहिला असा देखावा राहणार आहे. ऐतिहासिक घोडायात्रा, संगीतमय, श्रीमदभागवत सप्ताह, सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा आहे. जिल्ह्यातील ४० ते ५० हजार लोक भारावलेल्या उत्साह, आनंदाच्या अवस्थेत राष्ट्रीय एकात्मतेचा छताखाली एकत्र येणार आहेत. यात्रेदरम्यान येणाऱ्या हजारो लोकांना मनोरंजन व्हावे म्हणून मिना बाजार, सर्कस जादूचे प्रयोगाचे विविध प्रकारचे दुकाने सुध्दा थाटली गेली आहेत. (वार्ताहर)