झाडीपट्टीचे काश्मीर उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:45 AM2019-05-26T00:45:55+5:302019-05-26T00:46:33+5:30

वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झाडीपट्टीचे काश्मिर आज उपेक्षित झाले आहे.

Shrub Kashmiri neglected | झाडीपट्टीचे काश्मीर उपेक्षित

झाडीपट्टीचे काश्मीर उपेक्षित

Next
ठळक मुद्देपर्यटनाची मोठी संधी। भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झाडीपट्टीचे काश्मिर आज उपेक्षित झाले आहे.
भंडारा हा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीत श्रीमंत असा जिल्हा आहे. पूर्वी या प्रदेशाला गोंडवण म्हणत. आता त्याला झाडीपट्टी म्हणून संबोधले जाते. वैनगंगेच्या तिरावर वसलेल्या या जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा लाभला आहे. निसर्ग समृद्धीने नटलेला भंडारा जिल्हा विविधतनेमुळे मोहक आणि वैभवसंपन्न आहे. झाडीपट्टीचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. प्रांतगंगा म्हणून या प्रदेशाची ओळख असून आंभोरा येथे मराठीतील आद्यग्रंथ विवेकसिंधू ग्रंथाची निर्मिती झाली. या ग्रंथाचे रचयिता आद्यकवी मुकुंदराज यांचे येथे वास्तव्य होते. वैनगंगा व इतर लहान मोठ्या नऊ नद्या आपल्या कुशीत वसवून उत्तरेस डोंगराळ सातपुडा पर्वतमाला आहे. त्यात गायमुख, चांदपूर, गायगुरी डोंगराचा समावेश आहे. उत्तरेकडील उंचवट्याचा प्रदेश सातपुडा पर्वतरांगेत भिवसेन, कोका टेकड्या आहेत.
आपल्या नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशा शांत, रमणीय, ऐतिहासीक तिर्थक्षेत्र म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध आहे. झाडीपट्टीचे काश्मिर आणि महाराष्ट्राचे स्पेन म्हणून ही भूमी ओळखली जाते. सातपुड्याची हिरवीगार किमया, घनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणाऱ्या नद्या, निसर्गरम्य जलाशय, किल्ले, प्राचीन व ऐतिहासिक वास्तू, वन्यप्राणी आणि जैववैविधता येथे मुबलक आहेत. त्यामुळेच भंडारा जिल्हा पर्यटन चक्रवर्ती सिद्ध होऊ शकतो. परंतु सध्या शासन आणि प्रशासनाचे जिल्ह्याच्या पर्यटनाकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे.
भंडारा जिल्ह्यात गोंड राजे बख्तबुलंदशाह द्वारे निर्मित सुंदर व वास्तूशिल्पांचा ऐतिहासिक आंबागड किल्ला, सानगडी, पवनी, प्रतापगड, भंडारा येथील किल्ले प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे. विदर्भाची काशी म्हणून पवनी प्रसिद्ध आहे. अड्याळ येथील हनुमान मंदिर, भंडाराचे भ्रृशुंड गणेश मंदिर, प्रतापगडचे मंदिर व दरगा, माडगी येथील नृसिंह टेकडी, कोका अभयारण्य, चांदपूर, आंभोरा, कोरंभी, पांडे महल, रावणवाडी जलाशय, बंदरझिरा, नागझिरा, हत्तीडोई, गोसेखुर्द धरण असे एक ना अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. परंतु आजही येथे सुविधा नसल्याने पर्यटक पाठ फिरवितात. जाणीवपूर्वक प्रयत्न करून पर्यटकांना येथे आणले तर रोजगाराची मोठी संधी जिल्ह्यात निर्माण होऊ शकते.

तांदळाची पेठ
भंडारा हा जिल्हा संपूर्ण राज्यात तांदळाची पेठ म्हणून ओळखली जाते. येथील शेतकरी भाताचे मुख्य पीक घेतात. सर्वाधिक तलावांचा जिल्हा म्हणूही भंडाराची ओळख आहे. या जिल्ह्याला आद्यकवी मुकुंदराज, महानुभावाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचा पावनचरण स्पर्श झाला आहे. सम्राट अशोक, राजे बख्त बुलंदशाह, राजे रघुजी भोसले, पवन राजा यासारख्या शूरविरांच्या शौर्याचा व पराक्रमाचा हा जिल्हा आहे.

शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचा जिल्ह्याचा मोठा लौकीक आहे. झाडाझुडपांची बोली म्हणजेच झाडीबोली. साकोली परिसर झाडीबोलीचे प्रमुख केंद्र होय. नाटक, दंढार, तमाशा, भारुड असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा या सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळाचा मेळ घालणे गरजेचे आहे.
-मो.सईद शेख, पर्यटन अभ्यासक

Web Title: Shrub Kashmiri neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग