राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:24 AM2019-05-24T00:24:05+5:302019-05-24T00:25:09+5:30
वर्षभरापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा गढ भेदून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला होता. मात्र हा विजय आजच्या निवडणुकीत कायम राखता आला नाही. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर व परिणाम बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे कोमेजलेले दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वर्षभरापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा गढ भेदून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला होता. मात्र हा विजय आजच्या निवडणुकीत कायम राखता आला नाही. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर व परिणाम बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे कोमेजलेले दिसले. त्यांच्यात निरूत्साह दिसून आला.
भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रत्येक फेरीनिहाय मतांचा आकडा राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्यापेक्षा जास्त वाढत होता. परिणामी काही फेऱ्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मतमोजणी केंद्रातून बाहेर निघणे पसंत केले. दुपारी १२ वाजतापर्यंत दोन्ही उभयपक्षांमधील उमेदवारांच्या मतांचे अंतर वाढतच गेले. एकीकडे आनंदोत्सव तर दुसरीकडे हिरमुसलेले चेहरे दिसून आले. शहरातील साई मंदिर मार्गावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दुपारी २ वाजतानंतर कार्यालयात एक दोन व्यक्तींशिवाय कुणीही नव्हते. विशेष म्हणजे निवडणूक कालावधीत पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्या यांनी मांदियाळी असायची. मात्र गुरूवारी कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल हाती न आल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली.
भाजपने २०१४ सारखीच पुन्हा पुनरावृत्ती केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह त्यांच्या मित्रपक्षांच्या गोट्यातही असंतोष व हिरमुसलेपणा जाणवला. जिल्हा कार्यालयात असलेला शुकशुकाट पराभवाची चुणूक दाखवित होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्राबल्य मानले जाते. स्वत: खासदार पटेल निवडणुकीत उभे नसले तरी उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या रूपाने खासदार पटेल यांचे अस्तित्वही पणाला लागले होते. यात कार्यकर्त्यांनीही जोमाने प्रचाराला सुरूवात करून शेवटपर्यंत प्रचार कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. आजच्या निकालाने भाजप गोटात खुशी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहºयावर पराभवाचे दु:ख स्पष्ट दिसून आले.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
लोकसभा २०१८ च्या पोटनिवडणुकीत राकाँने मुसंडी मारली होती. मधुकर कुकडे हे विजयी झाले होते. यावेळीही विजयाची पुनरावृत्ती होईल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी प्रचारानंतर विजयाचे फळ चाखायला न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. 'कही खुशी कही गम'चा माहोलही यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहºयावरून अनुभवयास आला. पराभवाचे चिंतन करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी ऐकावयास मिळाला.