शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 10:17 PM2018-08-07T22:17:30+5:302018-08-07T22:18:51+5:30

राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तीन दिवस संपाची हाक दिली होती. यात नागरिकांना संंपाचा फटका बसला तर कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवला.

Shukushkat in government offices throughout the day | शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट

शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट

Next
ठळक मुद्देनागरिकांना फटका : आणखी दोन दिवस संपाच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तीन दिवस संपाची हाक दिली होती. यात नागरिकांना संंपाचा फटका बसला तर कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवला.
या संपात भंडारा जिल्ह्यातील राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. कर्मचाºयांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता.
राज्यातील सरकारी, निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा सातवा वेतन आयोग दिवाळीत देण्याची तयारी सुरु असल्याची माहिती वित्तमंत्र्यांनी दिली. परंतु सातवा वेतन आयोग आणि कर्मचाºयांच्या इतर प्रलंबित मागण्याबाबत शासन अशी आश्वासने गेली दोन वर्षे देत आहे. परंतु कारवाई मात्र होत नाही. मागण्यांबाबत शासन मौन बाळगून आहे. या दोन वर्षातील शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे कर्मचाºयांच्या तीन दिवसांच्या संपाला मंगळवरपासून प्रारंभ झाला आहे.
वित्तमंत्र्यानी अलिकडेच सातव्या वेतन आयोगासाठी नेमलेली के.पी. बक्षी समिती चार महिन्यानंतर अहवाल देईल असेही जाहीर केले होते.हे लक्षात घेता सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू करण्यात येईल ही माहिती कर्मचाºयांची दिशाभूल करणारी वाटत असल्याची बाब उपस्थित मार्गदर्शकांनी बोलून दाखविली.
यावेळी संपात सहभागी कर्मचाºयांना रामभाऊ येवले, वसंत लाखे, अतुल वर्मा, प्रमोद तिळके, विलास खोब्रागडे, प्रभाकर कळंबे, सतीश मारबते, ताराचंद बोरकर, दिगांबर गभणे, जयेश वेदी, विनोद राठोड, शाम बिलवणे, जयंत गडपायले, शिवपाल भाजीपाले, नरेश कुंभलकर, एस.बी. भोयर, अशोक निमकर, संजय पडोळे, दिलीप रोडके, जाधवराव साठवणे, मायाताई रामटेके, कल्पना पत्थे, रविंद्र मानापुरे, मधुसुदन चवळे, विशाल तायडे, गोविंदराव चरडे, रमेश व्यवहारे, व्ही.टी. बागडे, सुरेंद्र बन्सोड, रघुनाथ खराबे, गजानन लोणारे, गौरीशंकर मस्के, विरेंद्र ढबाले, मलकाम मोघरे, सूर्यभान कलचुरी, आर.एस. गडपायले, माधवराव फसाटे, वसंतराव लाखे, अरविंद चिखलीकर, ओ.बी. मेश्राम, निरंजन शहारे, चंद्रशेखर पडोळे, रोशन वंजारी, प्रतिमा सिंग, डी.एल. रामटेके, प्रियंका सतदेवे, जगदीश सतदेवे, निता सेन, एस.एस. साखरवाडे, किशोर राऊत, आशिष भुरे यांचेसह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा परिषद महासंघ जिल्हा परिषद समन्वय कृती समिती, कृतीशिल निवृत्त कर्मचारी संस्था, सर्व शिक्षक संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संघटना व जिल्हा परिषद सर्व संवर्ग निहाय संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यालयांमध्ये रिकाम्या खुर्च्या-टेबल
संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी झाले. संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय यासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी नसल्याने सर्वत्र शांतता होती. रिकाम्या खुर्च्या व टेबल असे चित्र बहुतांश सर्वच कार्यालयांमध्ये दिसून आले. ग्रामपातळीवर ग्रामसेवकांनीही त्यांचे कामकाज बंद केल्याने ग्रामीण भागातील कामकाजही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.
काय आहेत मागण्या?
सातव्या वेतन आयोगाबरोबर अंशदायी पेंशन योजना रद्द करा, १ जानेवारी २०१८ पासूनचा महागाई भत्ता मागील दोन भत्त्यांच्या १४ महिन्यांच्या थकबाकीसह त्वरीत मंजूर करा, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, रिक्त पदे ताबडतोब भरा, अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्यांसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांची एकवेळची बाब म्हणून भरती करा, महिला कर्मचाºयांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाचीच बाल संगोपन रजा द्यावी अशी मागणी आहे.
याशिवाय खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा, विनाअनुदान धोरण रद्द करा, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचे दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न तात्काळ निकालात काढा आदी कर्मचारी व शिक्षकांच्या २४ मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या आहेत.

Web Title: Shukushkat in government offices throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.