बांधकाम व्यावसायिक दुकानांचे शटर बंद, विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:20+5:302021-05-06T04:37:20+5:30
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने १५ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा ...
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने १५ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र लाखनी शहरात व तालुक्यात शटर बंद विक्री सुरू असल्याने स्थानिक प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता मोठ्या प्रमाणात जादा दर आकारून विक्री सुरू आहे. ही दुकाने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्याने तक्रार करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती धजावत नाही.
काही व्यावसायिक आपली माणसे दुकानासमोर बसवून ठेवतात. आलेल्या ग्राहकाला मागच्या दरवाजातून लागणारे साहित्य दिले जाते. त्यामुळे शटर बंद, विक्री सुरू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असाच प्रकार बार व्यावसायिक, दारू व्यावसायिक, तसेच अन्य बंद असलेले दुकानदार करीत आहेत.
मुरमाडीत दारू विक्री मोठ्या प्रमाणात
परिसरात मोहफुलाची दारूची विक्री मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू असून, दारूसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे. दारूसाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.