भंडारा-वरठी महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:57+5:302021-07-26T04:31:57+5:30

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा वळण, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते ...

Siege of Bhandara-Varathi Highway | भंडारा-वरठी महामार्गाची चाळण

भंडारा-वरठी महामार्गाची चाळण

googlenewsNext

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा वळण, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानकापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. यामुळे गंतव्य ठिकाणी वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वेस्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते. हा राज्यमार्ग तुमसरवरून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडतो. त्यामुळे वाहनांचा सतत राबता असतो. भंडारा-वरठीचे अंतर ११ किलोमीटर आहे, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सदर अंतर पार करण्यास तासभर वेळ लागतो. भंडारा शहरातील खांबतलाव ते शास्त्री चौकादरम्यान रस्त्याची अवस्था पायी चालणाऱ्यांकरिताही तारेवरची कसरत करणारी आहे. तर शास्त्री चौक ते टाकळीर्यंत रस्त्यांची चाळणी झाली आहे. दरवर्षी या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु कामाची कोणतीही गुणवत्ता राखली जात नसल्याने येथील खड्ड्यांना जणू अमरत्व प्राप्त झाले आहे.

या डागडुजीच्या कामातून केवळ कंत्राटदाराचे पोट भरले जात असून संबंधित अधिकाऱ्यांचे खिसेही भरले जात आहे. तर प्रवाशांचे हाल कायम आहे. खड्डे बुजविण्याकरिता वापरण्यात आलेल्या चुरीने दररोज अनेक वाहनांचे टायर पंक्चर होताना दिसतात. या समस्येमुळे दुचाकीचालक त्रस्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खराब असल्याने वाहन चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघातही घडले आहेत.

पावसामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Siege of Bhandara-Varathi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.