आयुध निर्माणीच्या जंगलात बिबट्याचे दर्शन
By admin | Published: January 29, 2017 12:53 AM2017-01-29T00:53:37+5:302017-01-29T00:53:37+5:30
आयुध निर्माणीच्या क्षेत्रात संरक्षण व शिकार मिळत असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर या क्षेत्रात वाढला आहे.
नागरिक भयभीत : वनविभागाने बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांकडून मागणी
भंडारा : आयुध निर्माणीच्या क्षेत्रात संरक्षण व शिकार मिळत असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर या क्षेत्रात वाढला आहे. खैरी सालेबर्डी येथील मंगल सोनबावणे स्वत:च्या बकऱ्या व गावातील काही बकऱ्या घेऊन आयुध निर्माणीच्या जंगलात २६ रोजी चरावयास घेऊन गेले होते.
सायंकाळच्या सुमारास घरी परत आले परंतु काही बकऱ्या न आल्याने ते गावालगतच्या आयुध निर्माणीच्या जंगलात सकाळी एकटेच बकऱ्या शोधण्याकरीता गेले असता त्यांना जंगलात दोन बछड्यांसह वाघीनीचे दर्शन झाले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गावाकडे धुम ठोकली व गावकऱ्यांना माहिती दिली. गावकरी लाठ्या काठ्या घेऊन जंगल पिंजून काढले तोपर्यंत बिबट बछड्यांसह पसार झाला. या परिसरात बिबट्याच्या भ्रमंतीमुळे परिसरातील गावे दहशतीखाली आल्यामुळे नागरिकांत दशहत निर्माण झाली आहे. आयुध निर्माणीचा परिसर वैनगंगेच्या पात्रापर्यंत विस्तारला असून या क्षेत्रात वन व जंगल भागही आहे. आयुध निर्माणीच्या क्षेत्रात प्रवेशबंदी असल्याने वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. या जंगलात हरिण, नीलगाय, रानडुकरे दिसतात. वनविभागाने पिंजरे लावून वाघाचे बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी सालेबर्डी, कवडशी खैरी येथील नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन
४करडी (पालोरा) : कोका वन्यजीव अभयारण्यात विविध प्रजातीच्या प्राण्यांनी संपन्न आहे. अभयारण्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनकुंड, बुंदेलघाट व गुलाली परिसर न्यु नागझिरा अभयारण्याला लागून आहे. मागील महिन्यापासून कोका वन्यजीव अभयारण्यात वाघांचे दर्शन होत आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा कोका अभयारण्याच्या दिशेने वळला असून पर्यटन वाढले आहे. सफारीदरम्यान वन्यप्रेमींना एका वाघीनीने ऐटीत दर्शन दिले. तो दिमाखदार फोटो शुट केला वन्यप्रेमी स्वप्नील दाभाडे यांनी. त्यावेळी त्यांच्या सोबत डॉ.सुनिल बोरकुटे व नीरज आठवले उपस्थित होते.