लाखांदूर तालुक्यात रेती घाटांवर सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:26+5:302021-02-13T04:34:26+5:30
सन २०१९ -२० मध्ये लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीवरील जवळपास १२ रेती घाट शासनाकडे पुढील तीन ...
सन २०१९ -२० मध्ये लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीवरील जवळपास १२ रेती घाट शासनाकडे पुढील तीन वर्षांसाठी लिलावासाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र सदर प्रस्तावानुसार तालुक्यात अद्याप एकही रेती घाट लिलाव न झाल्याने शासकीय व खाजगी बांधकामासाठी आवश्यक रेतीची चोरटी वाहतूक सुरू झाली. या संधीचा लाभ घेत तालुक्यातील काही तस्करांनी चक्क प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी वशिलेगिरी अथवा हफ्तेखोरीचा अवलंब केल्याने मोठ्या प्रमाणात रेती तस्करीला उधाण आले होते. सदर प्रक्रियेचा अवलंब न करता काहींनी घरकूल बांधकामाचा बनाव करीत रेतीची चोरटी वाहतूक चालविल्याची बाब आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बडवून खुलेआम रेतीची तस्करी सुरू असतांना शासन प्रशासन केवळ हफ्तेखोरी व वशिलेगिरीत चुप्पी साधून बसल्याने तालुक्यात रेती तस्करीला उधाण आल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यावर एका रेती चोरट्याच्या तक्रारीवरुन एसीबीने कारवाई केल्याची धास्ती घेत तालुक्यातील अन्य रेती तस्करांनी तूर्तास सदर व्यवसाय बंद केला असल्याचे बोलल्या जात आहे. एरवी रात्रीच्या सुमारास नदीकाठावरील गावात ट्रँक्टरसह रेती चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा आवाज गत एक दिवसापासून कानी पडत नसल्याने रेतीघाटावर सन्नाटा दिसून येत आहे. मात्र सदर परिस्थिती किती दिवस कायम राहणार..? असा सवाल करतांना आता तरी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हफ्तेखोरी व वशिलेगिरीचा नाद टाळून या रेती तस्करांना धडा शिकविणार का? अशीही चर्चा आहे.