सिलीमनाईट खाण बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:48 AM2019-05-27T00:48:42+5:302019-05-27T00:49:08+5:30
तालुक्यातील पोहरा येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाची सिलीमनाईट खाण बंद करण्याचा निर्णय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला आहे. आशिया खंडात व भारतात खनिज उत्पादनात नावलौकीक मिळविलेली खाण ४२ वर्षानंतर बंद पडणार आहे.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाची सिलीमनाईट खाण बंद करण्याचा निर्णय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला आहे. आशिया खंडात व भारतात खनिज उत्पादनात नावलौकीक मिळविलेली खाण ४२ वर्षानंतर बंद पडणार आहे. सध्यास्थितीत खाणीत २७ मजूर कामावर असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाखनीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पोहरा गावाचा परिसर टेकड्यांनी वेढला आहे. या परिसरात १९७७ पासून महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने सिलीमनाईट खाण सुरू केली. सदर खाणीचा परिसर ३९ हेक्टरचा आहे. त्यापैकी १९ हेक्टर परिसरात प्रत्यक्ष खाण आहे. १९७७ पासून सुरु असलेल्या या खाणीत सुरुवातीला ४७५ च्यावर खाण कामगार होते. पोहरा, मेंढा, गडपेंढरी, शिवनी, चान्ना, धानला या परिसरातील अनेक गावातील लोकांना रोजगार मिळाला होता. मोठ्या प्रमाणात खनिज उत्पादन होत होते. खनिजांना बाजारात प्रचंड मागणी होती. दररोज हजारो टन खनिजाचे उत्पादन होत होते. १९९४-९५ पासून उत्पादन घटल्याने महामंडळाने कामगारांना स्वेच्छानवृत्ती सुरू केली. तेव्हापासून खाणीच्या उत्पादनात घट होत गेली.
खनिकर्म महामंडळाने गेल्या १० ते १५ वर्षात पोहरा खाणीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या या खाणीत फलायरोफाईट नावाच्या खनिजाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी कौशल्याधारित, अर्धकौशल्याधारित २७ कामगार आहेत. वर्षभरात ८० ते ८५ टन खनिज बाहेर पाठविला जातो. महिन्याला ७० ते ७५ टन फलायरोफाईट खनिजाचे उत्पादन होते. पोहरा खाणीच्या खनिजाला बाजारात मागणी नाही कारण महामंडळाने निश्चित केलेला दर जास्त आहे.
खासगी उत्पादनकर्त्यांकडून कमी पैश्यात उद्योजकांना माल मिळतो. त्यामुळ ेपोहरा खाणीचा माल पडून आहे. फलायरोफाईटचा वापर सिरॅमिक उद्योगात केला जातो. पोहरा माईन्समध्ये अनेक लोखंडी साहित्य, वाहने पडून आहे. २७ कामगारांमध्ये ५ चौकीदार आहे तर एक कामगार कार्यालय सांभाळतो. कार्यालय तुटलेले आहे.
मौल्यवान खनिजांचा साठा
पोहरा खाणीत कोरंडम, तीन ग्रेडचे सिलीमनाईट, टमेलाईन फलायटाईट दोन ग्रेडचे उत्पादन घेतले जात होते. आशिया खंडात कोरंडम धातू निर्माण होणारी पोहरा ही एकमेव खाण आहे. भारतात सिलीमनाईटच्या उत्पादनात पोहरा ही खाण महत्त्वपूर्ण होती. कोरंडम व सिलीमनाईटचे उत्पादन सध्या होत नाही. परंतु कोरंडम व सिलीमनाईटमुळे खनिकर्म मंडळाला कोट्यवधीचा महसुल मिळत होता.
खाण बंद करण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ पोहरा खाणीच्या २७ कामगारांना १५ मे रोजी खनिकर्म मंडळाचे जनरल मॅनेजर पी. वाय. टेंभरे नोटीस पाठवुन खाण बंद करण्याच्या सुचना दिल्या आहे. गेल्या तीन वर्षापासून खाण तोट्यात चालत असून उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी असल्याने व उत्पादनाचा बजारात मागणी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महामंडळाची उदासीनता
महामंडळ खाण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरी २७ लक्ष रुपये शासनाकडे जमा करुन लिज वाढविली. खाणीचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या यापुर्वीच्या अध्यक्षांनी खाणीकडे कानाडोळा केला आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी पोहरा माईन्सच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. ९५ एकराचा पोहरा खाणीचा परिसर आहे. खाण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने एका सोनेरी युगाच्या शेवट होणार आहे.