भागवत सप्ताहात बांधल्या रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:36 AM2021-02-10T04:36:11+5:302021-02-10T04:36:11+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणा : अध्यात्माची मिळाली शिकवण मुखरू बागडे पालांदूर : भागवत सप्ताह म्हणजे कीर्तन, प्रवचनाची जोड आणि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणा : अध्यात्माची मिळाली शिकवण
मुखरू बागडे
पालांदूर : भागवत सप्ताह म्हणजे कीर्तन, प्रवचनाची जोड आणि त्यातून अध्यात्माची शिकवण. अशा मंगलमय सोहळ्यात विवाह होण्याचे प्रकार कमी असतात. मात्र, वधू-वराकडील आप्तेष्टांच्या शुभाशीर्वादाने एका नवदाम्पत्याला भागवत सप्ताहात विवाहबंधनात अडकून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्यात आला.
पालांदूर येथील मोतीराम खंडाईत यांची मुलगी मीनाक्षी ही नववधू तर पवनी तालुक्यातील ब्रह्मी येथील मनोहर धनजुळे यांचा मुलगा भक्तप्रल्हाद हा वर. विवाह सोहळा संत मंडळींच्या मंत्रोच्चारातून कीर्तनकार, प्रवचनकार दिगंबर पंढरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. म्हटले जाते की, विवाहाच्या रेशीमगाठी खुद्द भगवंतच बांधतात. हा विवाह सोहळा म्हणजे प्रत्येकांच्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. असा हा विवाह सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा अविस्मरणीय प्रसंग असतो. हा अविस्मरणीय प्रसंग साक्षात भागवत सप्ताहात ईश्वराला साक्षी ठेवीत, नवदाम्पत्यांना एकत्रित बांधल्या. उपस्थित शेकडोंच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला उपस्थित वर आणि वधूकडील पाहुणे मंडळींचे आदरातिथ्य करण्यात आले. रीतिरिवाजानुसार मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला. वराला वधू व वधूला वर पसंद पडला. लग्न सोहळा पार पाडण्याच्या अनुषंगाने भागवत सप्ताहात दोघांनाही विवाह बंधनात अडकविण्याचा विषय दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांसमोर ठेवला आणि नियोजनानुसार विवाह कार्य भागवत सप्ताहाच्या आध्यात्माच्या शिकवणीत पार पडला. कार्यक्रमाचे तंतोतंत नियोजनाने ब्रह्मी येथील वराकडील पाहुणे मंडळी भारावून गेले. ग्रामस्थांनी कार्यक्रमाची दखल घेत, असेच नियोजन आपल्याही गावी करण्याचा मनसुबा व्यक्त केला.
बॉक्स
भागवतातील बहुदा पहिलाच प्रकार
पालांदूर येथील भागवत सप्ताह पंचक्रोशीत परिचित आहे. त्यामुळे दोन्हींकडील मंडळींनी भागवत सप्ताहात लग्नाला होकार दिला.
कोरोना विषाणू महामारीनंतर भागवत सप्ताहात लग्न लावण्याचा कदाचित हा पहिलाच प्रकार असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेली प्रेरणा वर आणि वधूकडील मंडळींना पसंत पडली. हजारोंच्या साक्षीने वर-वधू यांचा मंगल सोहळा हनुमान देवस्थान पालांदूर येथे भागवत सप्ताहाच्या निमित्ताने गोपाल कालच्या दिवशी पार पडला.