कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:11+5:302021-02-05T08:42:11+5:30
नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे ...
नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे
चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे कामांना यांत्रिकी विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने सुरुवात केली असली तरी गाळ आणि केरकचऱ्याचे विल्हेवाट लावण्यात आले नाही. यामुळे कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत. यात शासनाच्या निधीचे वारे न्यारे होणार असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.
सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी १२ हजार हेक्टर आर शेतीला वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटपाचे नियोजन आणि प्रशासकीय कामकाजकरिता पाटबंधारे विभागाचे कार्यलय आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरणकरिता स्वतंत्र दोन विभाग करण्यात आले आहेत. उजवा आणि डावा कालवा अशी विभागणी करण्यात आली असून, स्वतंत्र शाखा अभियंते कार्यरत आहेत. प्रत्येकी कालवाअंतर्गत ६ हजार हेक्टर आर शेती ओलिताखाली आणली जात आहे. पाणी वाटपाचे नियोजन करण्याचे आधी कालवे आणि नहरे स्वच्छ करण्यात येत आहेत.
खरीप आणि उन्हाळी धान पिकांचे लागवडकरिता पाणीवाटप करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ आणि नहरे खोलीकरणाची कामे करण्यासाठी जलसंपदा विभागाअंतर्गत ई निविदा काढण्यात येत आहेत. निविदा धारक स्वतःचे यंत्रामार्फत कालवे, नहरे आदी स्वच्छ व खोलीकरण करीत आहेत. कालव्यातील निघणाऱ्या गाळ व केरकचऱ्याची ट्रॅक्टरच्या साहाय्याने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत आहे. कालवे व नहरातील गाळ, केरकचरा, खोलीकरण करण्याचे कामे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाअंतर्गत करण्यात येत आहेत. उजवा कालवा अंतर्गत मुख्य कालव्यातील गाळ व केरकचरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने उपसा करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ काठावर ठेवण्यात येत आहे. गाळ आणि केरकचरा पुन्हा कालव्यात जमा होत आहे. यामुळे शासनाच्या निधीचे वारे न्यारे करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यांत्रिकी विभागाअंतर्गत काठावरील माती मिश्रित गाळ ट्रॅक्टरच्या साहायाने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. यांत्रिकी विभाग गाळ काढण्याची औपचारिकता करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जेसीबी मशीनचालकाला गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याचे सांगितले. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे गाळ व केरकचरा काढताना ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. यात शासनाच्या निधीचा चुराडा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, गाळ उपसा करताना पारदर्शकता नाही. परिसरातील कालवे आणि नहरे गाळ व केरकचऱ्याने तुंबले आहेत. यामुळे जलद गतीने पाणी शेतशिवारात पोहोचत नाही. यानंतर शेतकऱ्यांची बोंबाबोंब सुरू होत आहे. शासनाने या बाबीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
सत्यतेला अधिकाऱ्यांचा दुजोरा
कालव्यातील मातीमिश्रित गाळ आणि केरकचरा उपसा करताना अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. उपसा करण्यात आलेली गाळ कालव्याचे काठावर ठेवण्यात येत असल्याने पुन्हा कालव्यात जमा होणार आहे. यामुळे ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होणार आहे. या प्रकाराला उजव्या कालव्याचे शाखा अभियंता गंगाधर हटवार यांनी दुजोरा दिला आहे. कालव्यातून निघालेल्या गाळ व केरकचऱ्याची अन्य जागेत विल्हेवाट लावण्याची गरज असून, हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, असे असले तरी हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आलेला नाही. यामुळे चर्चां सुरू झालेल्या आहेत.