सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग, असा संदेश आल्यास सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:26+5:302021-06-02T04:26:26+5:30
कोरोना संक्रमण काळात अशा फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. सायबर कायद्यानुसार ...
कोरोना संक्रमण काळात अशा फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. सायबर कायद्यानुसार हा गुन्हा असून, सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, अशी बाब सातत्याने आवाहनाच्या रूपाने करण्यात येते. फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, सोशल मीडियासह मोबाइल कंपन्यांची नावे घेऊन फसवणूक करीत असल्याचे प्रकार वाढले आहेत. ‘सिम कार्ड खराब झाले आहे, ब्लॉक झाले आहे, ते आपण बदलून घ्यावे आपल्याला आलेला ओटीपी आम्हाला पाठवावा,’ असा संदेश पाठवून दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा, असे म्हटले जाते. यासंदर्भात एखाद्या ग्राहकाने संपर्क साधल्यास त्याला अलगद फसविले जाते. सिम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सन २०१९ ते २०२१ या कालावधीत सदर प्रकार जास्त प्रमाणात घडले आहेत. आता फक्त जागरूक राहणे हाच यामागील प्रमुख मार्ग असल्याचेही जिल्हा पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.
बॉक्स
ॲप-डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान !
सद्य:स्थितीत विविध प्रकारचे ॲप्स आले आहेत. याची माहिती अनेकांच्या मोबाइलवर संदेश रूपाने येत असते. त्यातच सदर ॲप डाऊनलोड करताना फोन कॉल्स, मीडिया गॅलरी यासह तुमचा मोबाइलमधील डेटा प्राप्त करण्याची परवानगीही मागितली जाते. परिणामी, ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात येते.
बॉक्स
असा कॉल व मेसेज आल्यास..
सिम व्हेरिफिकेशन किंवा अन्य सोशल मीडियाबाबत माहिती देत संदेश आला तर त्याला निगलेक्ट करणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्याला कुठलाही प्रतिसाद देऊ नये, परिणामी फसवणुकीची शक्यता ही शून्य असते. एखाद वेळेस भ्रमणध्वनीवरून पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो, मात्र तेव्हाही कुठलाही प्रतिसाद ग्राहकाने किंवा नागरिकांनी देऊ नये. कधीही कुठलीही बँक किंवा शासकीय कार्यालयांमार्फत पासवर्ड किंवा आयडी क्रमांक विचारला अथवा मागितला जात नाही. अशा वेळी सतर्कता बाळगून कुठलीही माहिती देऊ नये.
बॉक्स
अशी घ्या काळजी
सोशल मीडिया किंवा फोनवरून आलेल्या संदेशाला कधीही प्रतिसाद देऊ नये किंवा आलेला संदेश मोबाइलमधून डिलीट करून टाकावा. हेच बचावात्मक सर्वोत्तम काळजी आहे.
कोट
फेसबुक अकाउंट या माध्यमातून हा प्रकार सातत्याने घडत आहे. एखादवेळी आपल्या आधार क्रमांकाच्या आधारेही अकाउंट हॅक करून फसवणूक केली जाते. त्यामुळे आपला ओटीपी पासवर्ड कोणालाही शेअर करू नका तसेच सावधानता बाळगावी.
वसंत जाधव,
जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा