भंडारा जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:30+5:302021-05-26T04:35:30+5:30
भंडारा : संकटात सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी भंडारा पोलीस दलातर्फे लवकरच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत आहे. ...
भंडारा : संकटात सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी भंडारा पोलीस दलातर्फे लवकरच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी ११२ नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत पोलीस मदतीला पोहोचणार आहेत.
जिल्ह्यात पोलिसांशी आपत्कालीन संपर्क साधण्यासाठी १०० हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी एमईआरएस डायल प्रकल्पांतर्गत बदलला जाणार आहे. लवकरच ११२ या एकाच हेल्पलाइनवरून सर्वांना मदत मिळणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात आठ चारचाकी वाहने प्राप्त झाली असून, आणखी १७ चारचाकी व २९ दुचाकीची मागणी पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. कम्प्युटर असेस डीसपॅच (सीएडी) व लाॅगीट्युड बेस सिस्टीम (एलबीएस) वापर करून मदत मिळणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षासह अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाईल्ड हेल्पलाइन व इतर सेवेसाठी एकाच वेळी संपर्क करता येईल.
पोलीस मदत हवी असल्यास डायल ११२
जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकाला आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी असल्यास ११२ हा क्रमांक डायल करायचा आहे. अवघ्या दहा मिनिटांत पोलीस मदतीला धावून येतील.
डायल ११२ हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ही सुविधा जिल्हाभरात कार्यान्वित होणार आहे.
काॅल येताच कळणार लोकेशन
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ११२ हा नवीन हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. सीएडी आणि एलबीएस या यंत्रणेच्या मदतीने व वाहनावरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कुठून आला त्याचे लोकेशन प्राप्त होईल. त्यामुळे मदत पोहोचविण्याच्या अनुषंगाने यंत्रणा सज्ज करता येणार आहे. आरोपी फरार होणे, पोलीस उशिरा पोहोचणे याला आळा बसेल.
आठ चारचाकी वाहने
जिल्ह्याला आठ चारचाकी वाहने या प्रकल्पांतर्गत प्राप्त झाली असून, आणखी १७ चारचाकी व २९ दुचाकी वाहनांची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे.
२३३ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
भंडारा जिल्हा पोलीस दलातील २३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांचे विशेष प्रशिक्षण डायल ११२ प्रकल्पांतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले आहे.
पोलीस दल अधिक हायटेक करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सातत्याने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डायल ११२ प्रकल्प कार्यान्वित होत आहे. लवकरच ही सेवा भंडारा जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे.
-अनिकेत भारती, अपर पोलीस अधीक्षक