बिल संकलनाचे एकच केंद्र, लिंक फेलमुळे ग्राहकांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:17 PM2024-11-12T12:17:16+5:302024-11-12T12:26:26+5:30
आणखी एक केंद्र मंजूर करा : ग्राहकांना वारंवार मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यात सिहोरा परिसरात ४७ गावे आहेत. वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. दोन विभागात हे कार्यालय असले तरी घरगुती वीज ग्राहकांची मोठी संख्या असताना वीज बिलांचे एकच संकलन केंद्र आहे. यामुळे संकलन केंद्रात मोठी गर्दी राहत आहे. नियोजित तारखेच्या आत घरगुती ग्राहक वीज बिलाचे देयक भरण्यासाठी केंद्रावर गेले असता लिंक फेलचा फटका ग्राहकांना बसत आहे. पुन्हा गावात अन्य एक वीजबिल संकलन मंजूर करण्याची मागणी आहे.
परिसरात घरगुती विजेचे ग्राहक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या सोईसाठी सिहोरा गावात वीज वितरण कंपनीचे कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. विस्ताराने मोठा असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दोन विभागात विभागणी करण्यात आली आहे. सिहोरा १ आणि सिहोरा २ असे स्वतंत्र विभाग कार्यरत असून दोन्ही विभागांना स्वतंत्र शाखा अभियंता आणि लाईनमनचा फौजफाटा आहे. दोन्ही विभागात घरगुती वीज ग्राहकांची मोठी संख्या आहे. ग्राहकांच्या सोईसाठी सिहोरा गावात वीज बिलांचे देयक संकलन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. हा केंद्र एकमेव असल्याने ग्राहकांची तारांबळ उडत आहे. सिहोरा गावात परिसरातील गावातील नागरिक कामानिमित्त येत आहे. सोबतच विजेचे बिल भरत आहेत. या गावात मंजूर असलेले वीज बिलाचे देयक केंद्र सोयीचे ठरत आहेत. परंतु घरगुती विजेच्या ग्राहकांची संख्या मोठी असल्याने या एकमेव केंद्रात ग्राहकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. लिंक फेलचा त्रास मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. या गावात अन्य एक केंद्र वीज बिलाचे देयक करण्यासाठी सुरू करण्यात आले नाही. ही बाब वीज वितरण कंपनीच्या कार्यरत यंत्रणेला माहीत आहे. परंतु महावितरणच्या माध्यमातून सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही.
सिमेंट रस्त्याचे बांधकाम डोईजड होणार
वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ये-जा करण्यासाठी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यासाठी ओरड होती. राष्ट्रीय महामार्गापासून कार्यालयात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पावसाळ्यात व चांदपूर जलाशयाचे पाणी वाहून नेणारा पूल बांधकाम करण्यात आले नाही. आधीचा पूल भुईसपाट झाला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाने पाणी अडले जाणार आहे. सुरुवातीला पुन्हा ऐन पावसाळ्यात रस्ता डोईजड होणार आहे. सिमेंट रस्ता बांधकाम करताना या विभागाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात कर्मचारी व ग्राहकांना कसरत करावी लागणार आहे.