साहेब, पुरात सर्वस्व वाहून गेले पण मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 07:00 AM2020-09-04T07:00:00+5:302020-09-04T07:00:17+5:30

साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे भंडारा शहरातील अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते.

Sir, the flood washed away everything but no help | साहेब, पुरात सर्वस्व वाहून गेले पण मदत नाही

साहेब, पुरात सर्वस्व वाहून गेले पण मदत नाही

Next
ठळक मुद्दे आनंदनगर, कपिलनगरात शासकीय यंत्रणा पोहचलीच नाहीशेकडो कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्यही वाहून गेल्याने खायचे काय? असा बिकट प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला. पुरानंतरच्या परिस्थितीची बिकट अवस्था काय? याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या भेटीत भीषण वास्तव समोर आले. जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील आनंदनगर, कपिलनगरात अद्यापही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही. साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते.

भंडारा शहरातील एकेकाळची विरळ वस्ती तर आता घनदाट रहिवासी वस्ती म्हणून प्रभाग क्रमांक ९ मधील आनंदनगर व कपिलनगराची ओळख आहे. या दोन्ही नगरात जवळपास चारशेच्या जवळपास घरे आहेत. गत शनिवार व रविवारी वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने या नगरालाही सोडले नाही. वैनगंगा नदीचे बॅकवॉटर नाल्यातून या दोन्ही नगरात शिरले. पाहता-पाहता अनेकांची घरे पाण्याखाली आली. घरातील साहित्य पाण्यात बुडाले. घरात इलेक्ट्रॉनिक साहित्य अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. सहा ते सात फूट पाणी असलेल्या घरातून बाहेर कसे पडावे, याची भीती असलेल्या नागरिकांनी घराच्या स्लॅबवर राहणे पसंत केले.

माजी नगरसेवकाने नावेची व्यवस्था केली होती. उल्लेखनीय म्हणजे आनंदनगरातील काही उमद्या तरुणांनी साहस दाखवित अनेकांना मदतीचा हात दिला. शनिवारी चार फुटांपर्यंत पाणी साचले असताना रविवारी पाणी पातळीत वाढ होऊन सात फुटांपर्यंत पोहोचली. आनंदनगरातून गेलेल्या नाल्यामुळे दोन्ही नगरातील नागरिकांचा जीव संकटात सापडला. रात्र वैऱ्याची असली तरी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून धीर देण्याचा प्रयत्न केला. हा धीर ऐन संकटाच्या काळी उमेद म्हणून कामी आला. मात्र शासकीय यंत्रणा पुराच्या वेळी बेपत्ता असल्याचे दिसून आले.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या परिसराची पाहणी केली, निर्देशही दिले, मात्र गाफील यंत्रणा कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. एकाला मदत तर दुसºयाला नाही, अशीही स्थिती बघावयास मिळाली. पूर ओसरून चार दिवसांचा कालावधी झाला पण साधे पंचनामेही झाले नाहीत. तलाठी इकडे फिरकलेच नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपालिका हद्दीत येत असलेल्या या प्रभागात नगरसेवकांनी रात्रीला मदत देऊ केली. काहींची जेवणाची सोय करण्यात आली. येथील स्थानिक दोन नागरिक देवदूत बनून नागरिकांच्या मदतीसाठी धावले.

अनेकांसाठी अन्न व पाण्याची सोय करून दिली. नगरसेवक आशू गोंडाणे यांनी नागरिकांसाठी जेवणाची सोय केली होती. मात्र पूर बाधितांची संख्या जास्त असल्याने व घरात पाण्याच्या शिरकाव जास्त प्रमाणात झाल्याने लोकांपर्यंत नागरिकांना पूर्णत: मदत मिळू शकली नाही. सद्य स्थितीत काही ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पूर ओसरल्यानंतर शासकीय यंत्रणा इकडे फिरकायला तयार नसल्याचे वास्तव आहे.

 

Web Title: Sir, the flood washed away everything but no help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर