साहेब, घरी बसून कुटुंबाला जगवायचे तरी कसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:42+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दररोज दीडशे व्हेंडरची रोजीरोटी आहे. आता प्रवाशी गाड्याच बंद आहेत. त्यामुळे येथे काम करणारे घरात बसून आहेत.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : साहेब, मरणाची भीती कुणाला नाही. कोरोना का काय म्हनतात तो रोग आला मंते. आता सरकारनं आमाले घरात बसवलं. कामावर गेल्याशिवाय तोंडात घास जात नाही. आता चार दिवसापासून घरात बसून आहो. किती दिवस घरात राहावे लागल सांगता येत नाही. अशा स्थितीत आम्ही कुटुंबाला कसे जगवायचे असा प्रश्न कोरोनामुळे घरात कोंडल्या गेलेले रोजंदारी मजूर आणि हातावर आणून पानावर खाणारे विचारत आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दररोज दीडशे व्हेंडरची रोजीरोटी आहे. आता प्रवाशी गाड्याच बंद आहेत. त्यामुळे येथे काम करणारे घरात बसून आहेत. रेल्वे स्टेशनवरील विक्रेता शेखर ठवकर म्हणाला, जमवलेले पैसे खर्च करणे सुरु आहे. चार ते पाच हजार रुपये हातात आहे. हा पैसा संपल्यावर काय करावे अशी चिंता आहे. कोरोनाचा कहर लवकर थांबेल असे वाटत नाही. आता शासनानेच काहीतरी उपाय योजावे असे तो म्हणाला.
देव्हाडी रेल्वे स्थानक परिसरात दहा ते बारा गावातील दोन ते अडीच हजार मजूर विविध ठिकाणी जाण्यासाठी येतात. गत काही दिवसांपासून हा परिसर सुनसान झाला आहे. याच कामावर जाणारा राहुल भोयर म्हणाला, आम्ही सध्या गावात घरी बसून आहोत. घरात असलेल्या अन्नधान्यावर सध्या दिवस काढत आहोत. परंतु तोही एक दिवस संपेल. त्यानंतर आम्ही कुठून आणायचे आणि जगायचे कसे असा सवाल त्याने केला. ऑटोरिक्षा व्यवसाय करणाऱ्याचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. तुमसर - देव्हाडी मार्गावर १०२ च्या वर ऑटोरिक्षा धावतात. दररोज २०० ते ३०० रुपये कमाई होते. चार दिवसापासून ऑटोरिक्षा बंद आहे. त्यामुळे या ऑटोरिक्षा चालकांचे ४०० ते ४५० कुटुंबियांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा असल्याचे ऑटोरिक्षा चालक रवी भोंगे, नामदेव धारंगे, हिफजूल कुरैशी, घनश्याम भोंगाडे, भोला मनवर यांनी सांगितले.
अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही रोजमजूरी करणाऱ्यांची आहे. गावात कोणते काम नाही. घराबाहेर पडता येत नाही. घरातील अन्नधान्य पडल्यावर काय करावे आणि कुठे जावे असा सवाल कुटुंब प्रमुखांना सतावत आहे.
जीवन थांबल्यासारखे जाणवते
कापड शिवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढणारा शंभू केवट म्हणाले, चार दिवसापासून एक पैसाही हातात आला नाही. आर्थिक परिस्थिती खालावली आहे. जणू काही आमचे जीवनच थांबल्यासारखे झाले आहे. कुटुंब मोठे आणि पैसा नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाढा कुठपर्यंत आणि कसा ओढावा असे त्यांनी सांगितले.