साहेब, पीककर्ज भरायचे आहे, धानाचे पैसे द्या जी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:33+5:302021-03-24T04:33:33+5:30
पालांदूर : मोठ्या मेहनतीने धान पिकवला. आधारभूत केंद्रावर धान विकण्यासाठी धडपड केली. एकदाचा धान विकला. पण आता दीड महिना ...
पालांदूर : मोठ्या मेहनतीने धान पिकवला. आधारभूत केंद्रावर धान विकण्यासाठी धडपड केली. एकदाचा धान विकला. पण आता दीड महिना झाला तरी चुकारे नाही. आता पीककर्ज भरण्यासाठी आठवडाही उरला नाही. सांगा अशाने आम्हाला शून्य व्याज दर योजनेचा कसा फायदा मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांपुढे हा नवा पेच निर्माण झाला आहे. साहेब, पीक कर्ज भरायचे आहे, धानाचे पैसे द्या जी... अशी आर्त हाक शेतकरी शासनाला मारत आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची रक्कम भरण्यासाठी शेवटची तरीख ३१ मार्च आहे. यापूर्वी पैसे भरले तरच शून्य व्याजदर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वेळेत पीक कर्ज भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आधारभूत केंद्रावर आपला धान विकाला. काही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले पण हजारो शेतकरी गत महिना दीड महिन्यापासून चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात मिळेल त्याच्याकडून उधार उसनवार घेण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. पीक कर्ज भरण्याची अंतिम घडी जवळ येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाकडेच शेतकऱ्यांचे पैसे आहेत, पण ते पैसे ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते न केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटाका बसणार आहे. गत वर्षापासूनची नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आशादायी ठरलेली प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना मृगजळच ठरलेली आहे.
शासनाने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर झालेला आहे. तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. गतवर्षी हाच बोनस शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्याकरिता महत्त्वाचा ठरलेला होता. १८ फेब्रुवारीपासून धानाचे चुकारे प्रलंबित आहेत. आता शेतकरी चातकासारखी वाट पाहत आहेत.
बॉक्स
आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची चुकारे अगदी दोन ते तीन दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. असा आशावाद जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांच्याकडून कळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे टकाणे सुरू झाले आहेत. पालांदूर सेंटरला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागू शकतो. अशी अधिकृत माहिती जिल्हा पणन कार्यालयाकडून मिळालेली आहे.
कोट
शासनाने आमचे हक्काचे असलेले पैसे वेळेत आम्हाला दिल्यास शून्य व्याज जर योजनेचे लाभार्थी ठरू. शासन-प्रशासनाने ३१ मार्चपूर्वी आमचे पैसे खात्यात वळते करावे. ओला दुष्काळ, मावा, तुडतुडे यांनी आलेले अत्यल्प उत्पन्न निश्चितच चिंतादाई ठरले. सरकारने आमचे हक्काचे पैसे आम्हाला द्यावे व आमची चिंता दूर करावी.
मनोहर खंडाईत, शेतकरी