साहेब, साकोली तालुक्यातही भेट दिल्यास सर्व माहित होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 05:00 AM2022-05-07T05:00:00+5:302022-05-07T05:00:54+5:30
साकोली तालुक्यातील चुलबंद नदीचे पात्र गेले आहे. साकोली तालुक्यातून परसोडी ते मोहघाटा गावापर्यंत ही नदी गेलेली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रेतीचे घाट आहेत. या घाटात चांगल्या प्रकारची रेतेही उपलब्ध आहे. महसूल प्रशासनही सक्षम आहे. मात्र आर्थिक देवाण-घेवाणमुळे सध्या रेती तस्करीला सुगीचे दिवस आले आहेत. परिणामी अधिकारी व रेती माफिया यांचे चांगभले होत आहे.
संजय साठवणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
साकोली : उपविभागीय अधिकाऱ्यांवर रेती तस्करांनी हल्ला केल्यानंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भंडारा तालुक्यातील वडेगाव रेती घाटावर धाड मारली व तब्बल ११ ट्रॅक्टर ताब्यात घेतली. साहेब अशीच एक भेट साकोली तालुक्यातही द्या, म्हणजे आपले अधिकारी किती प्रामाणिकपणे काम करीत आहेत हे आपणालाही दिसेल. रेती तस्करी किती प्रमाणात सुरू आहे हेही कळेल. यापूर्वी साकोली तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रेती साठे सापडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहेत.
साकोली तालुक्यातील चुलबंद नदीचे पात्र गेले आहे. साकोली तालुक्यातून परसोडी ते मोहघाटा गावापर्यंत ही नदी गेलेली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रेतीचे घाट आहेत. या घाटात चांगल्या प्रकारची रेतेही उपलब्ध आहे. महसूल प्रशासनही सक्षम आहे. मात्र आर्थिक देवाण-घेवाणमुळे सध्या रेती तस्करीला सुगीचे दिवस आले आहेत. परिणामी अधिकारी व रेती माफिया यांचे चांगभले होत आहे.
साकोली तालुक्यात महसूल विभागामार्फत मोठ्या प्रमाणात धाडी मारण्यात येतात. तत्कालीन तहसीलदार यांच्या कार्यकाळात महसूल व पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईत १५ ते २० ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते, मात्र माशी कुठे शिंकली हे कळलेच नाही. मात्र तहसील कार्यालयातून दुसऱ्या दिवशी रात्री ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेची रितसर पोलिसात तक्रारही करण्यात आली हा संशोधनाचा विषय ठरला आहे. यानंतरही साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात धाडी मारल्या गेल्या. अनेक गावात रेती साठा मिळाला. काहींवर कारवाई झाली. काहींना सोडण्यात आले.
उमरी परिसरात तर गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून तहसीलच्या हवाले केले. असे अनेक प्रकार साकोली तालुका सुरू असले तरी साकोली तालुक्यातील राजरोसपणे अवैध रेती सुरू आहे.
ट्रॅक्टर्स एसटी डेपोत
- तहसील कार्यालयातून जप्तीचे ट्रॅक्टर चोरी गेली तेव्हापासून टिप्पर व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात न ठेवता एसटी डेपो ठेवले जातात, ही परिस्थिती का आली यांचा विचार वरिष्ठांनी करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
रात्रीस खेळ चाले
- साकोली तालुक्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली असून हा सर्व खेळ रात्री होत असते. ट्रॅक्टर व मिनी ट्रक यांच्या सहाय्याने ही तस्करी सुरू आहे, याची कल्पना अधिकाऱ्यांना असूनही ते गप्प का, असा प्रश्न आहे आहे.