Coronavirus in Bhandara; साहेब, खूप अर्जंट काम आहे, जावंच लागेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:40 PM2021-04-28T16:40:41+5:302021-04-28T16:41:44+5:30
Bhandara news साहेब, खूप अर्जंट काम आहे. नागपूरला जावेच लागेल. जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले आहे. मित्राची आई आजारी आहे, तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी जाणे गरजेचे आहे, माझी वैद्यकीय तपासणी करायची आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून एसटी बसमधून प्रवास करण्याचा प्रयत्न सध्या सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साहेब, खूप अर्जंट काम आहे. नागपूरला जावेच लागेल. जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले आहे. मित्राची आई आजारी आहे, तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी जाणे गरजेचे आहे, माझी वैद्यकीय तपासणी करायची आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून एसटी बसमधून प्रवास करण्याचा प्रयत्न सध्या सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. तसेही भंडारा विभागात संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेला अत्यल्प प्रतिसाद दिसत आहे.
भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा सद्य:स्थितीत सुरू आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी या बसने प्रवास करतात. मात्र, काही प्रवासीही बसस्थानकावर येऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी वाहकासोबत त्यांचा वादही होतो. अतिशय महत्त्वाचे काम आहे असे सांगून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, तोही दिवसातून एक-दोनदाच अनुभव येतो. विशेष म्हणजे बसस्थानकावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेला पत्र दिले आहे. परंतु, अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी विना स्कॅनिंगनेच प्रवास करताना दिसून येतात. यामुळे कुणी आजारी प्रवासी असल्यास संपूर्ण बसच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भंडारा विभागाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
तीच ती कारणे
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. त्यासाठी त्यांना आयकार्ड दाखविणे गरजेचे आहे. परंतु, असे असतानाही काही प्रवासी बसस्थानकावर येतात. विविध कारणे सांगून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यांना रोखण्यात येते. अनेकदा प्रवाशांची निकड पाहून प्रवास करण्याची मुभाही दिली जाते. परंतु, अत्यल्प प्रवाशांमुळे अशी संख्या कमी असते.
नागपूर मार्गावर गर्दी
भंडाराहून नागपूर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सकाळी ८ वाजल्यापासून बसस्थानकावर वर्दळ दिसते. अनेक प्रवासी दररोज शासकीय कामाच्या निमित्ताने नागपूरला जातात. तसेच सायंकाळी परत येतानाही गर्दी दिसून येते. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. तेवढे प्रवासीही सध्या मिळणे कठीण झाले आहे. अनेकांनी आता खासगी वाहनांचा आधार घेतला असून, एसटीकडे पाठ फिरविली आहे.
थर्मल स्कॅनिंगचा अभाव
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासापूर्वी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा प्रशासनाला थर्मल स्कॅनिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, अद्यापही येथे थर्मल स्कॅनिंग होत नाही. त्यामुळे केवळ ओळखपत्र पाहूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश देण्याशिवाय पर्याय नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करीत आहेत. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक सहसा प्रवास करीत नसल्याचे चित्र आहे. वाद होतात, परंतु त्यांना स्पष्टपणे समजावून सांगितले जाते. थर्मल स्कॅनिंगसाठी प्रशासनाकडे मागणी केली असून, लवकरच ही सुविधा बसस्थानकावर दिसेल.
-डाॅ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी