साहेब, काय बी करा आमाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:36 PM2020-09-22T16:36:21+5:302020-09-22T17:15:38+5:30
पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते.
संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काय सांगू साहेब, पुरात झोपडीत होतं नव्हतं ते सर्व वाहून गेलं. दहा वर्षात काडी-काडी जमवत चिमणीसारख घरट बांधलं. पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते, असे सांगत हमसून हमसून रडत महापूराची व्यथा मांगगारोडी समाजाच्या वस्तीतील महिला सांगत होत्या. महापूर उलटून आता २० दिवस झाले तरी कुणी मदतीसाठी धावून आले नाही. आजही ही मंडळी उघड्यावर असल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने केलेल्या रियालीटी चेकमध्ये पुढे आले.
वैनगंगा नदीच्या विशाल पात्रालगत कारधा परिसरात मांगगारुडी समाजाची वस्ती आहे. गत तीस वर्षांपासून ही मंडळी मिळेत ते काम करीत या ठिकाणी वास्तव्याला आहेत. भटक्या समाजाची ही मंडळी झोपड्या करुन राहतात. दररोज आपल्या तान्हुल्यांना घेऊन भंडारा शहरात रोजगारासाठी भटकतात. कुणी मणी बेसर विकतात तर पुरुष मंडळी मिळेल ते काम करतात. कोरोना संकटाच्या महामारीतही या वसाहतीत कोरोना पोहोचला नाही. ते सर्वांसाठी समाधान आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असताना २९ आॅगस्टच्या रात्री वैनगंगा कोपली आणि एका विशाल लाटेत संपूर्ण झोपडपट्टी वाहून गेली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र आता मरणापेक्षाही अधिक यातना घेवून येथील मंडळी जगत आहे. शासन आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडलेल्या या झोपडपट्टीतील मंडळीचे विदारक वास्तव पाहून कुणाच्याही डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही.
या झोपडपट्टीतील रहिवासी शिवा कांबळे म्हणाले, नदीकाठावर आमची वस्ती आहे, ना रोजगार ना हक्काचे घर, दररोज दोन घासासाठी आमचा संघर्ष सुरु असतो. पुराने आमची घरे उद्ध्वस्त झाली. शासनाने आमचे पुनर्वसन करावे, आम्हाला घरे बांधून द्यावी, असे सांगत चिमुकल्यांची अन्नासाठी होणारी तडफड पाहावत नाही, असे त्याने सांगितले.
रंजू शेंडे, मोनिका पूर्वले, जॉकी लोंढे, बारुबाई गायकवाड, दशमाबाई शेंडे, सुबी दुनाडे यांनी पुरानंतरची व्यथा सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, पुराच्यावेळी ग्रामपंचायतीने चार पाच दिवस खाण्यापिण्याची सोय केली. त्यानंतर काही मंडळीनी धान्य आणून दिले. परंतू ही मदत आता संपली आहे. कोरोनामुळे गावात रोजगार मिळत नाही. लहान मुलांची अन्नासाठी तडफड होत आहे. शासनाचे माणसं आली पाहणी करुन धीर देवून गेली. मात्र अद्याप एक रुपयाची मदत आली नाही. एक किलोही धान्या मिळाले नसल्याचे या महिलांनी सांगितले.
वस्तीत वीज नाही, रस्त्यावरच झोपतो
वैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक झोपड्यात पाणी शिरले. काही झोपड्या वाहून गेल्या. पुरग्रस्तांना प्रकाश हायस्कूलच्या पटांगणात आश्रय देण्यात आला. परंतु शाळा व्यवस्थापनाने हात वर केले. त्यामुळे ही मंडळी पुन्हा उद्ध्वस्त झोपड्यात राहायला आली. वीजेचा पत्ता नाही, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा कायम धोका असतो. त्यामुळे अनेकजण आता जवळच असलेल्या डांबरी रस्त्यावर रात्री झोपतात. शासनाने झोपड्या बांधून निवासाची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली.
५० रुपयांसाठी दिवसभर वणवण
महापुरात उद्ध्वस्त झालेले प्रभू पाथरे सांगत होते, दोन म्हशी, दोन शेळ्या पुरात वाहून गेल्या स्वत:चा जीव कसाबसा वाचला. पण जित्राबाला नाही वाचवू शकलो. जगण्याचे साधनच गेल्याने आता करावे तरी काय, पन्नास रुपयांसाठी वणवण भटकंती करतो. पण तेही मिळत नाही. सायंकाळी जेवायला मिळेल की नाही याचीही शास्वती नसते.