ट्रकच्या धडकेत बहीण जागीच ठार, भाऊ गंभीर जखमी; देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:00 PM2022-12-17T14:00:48+5:302022-12-17T14:04:00+5:30
ट्रकच्या चाकाखाली डोके चेंदामेंदा
भंडारा : समोरून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने बहीण- भावाची दुचाकी रस्त्यावर कोसळल्यानंतर अचानक मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून बहीण जागीच ठार, तर भाऊ गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
किरण सुखदेव आगाशे (२५), असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (२१), रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, असे जखमीचे नाव आहे. किरण ही सीआरपीएफमध्ये मुंबई येथे कार्यरत होती. शुक्रवारी ती भाऊ लोकेशसोबत तुमसर येथे कपडे खरेदीसाठी आली होती. खरेदी करून दुचाकीने ते (एमएच ३६ ए ६६९३) निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने किरण आणि लोकेश दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी मागून आलेल्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि ती जागीच ठार झाली. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. मेंदूचा चेंदामेंदा झाला होता, तर भाऊ लोकेश हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
दोन दिवसांनंतर होते किरणचे साक्षगंध
किरण आगाशे ही सीआरपीएफमध्ये मुंबई येथे कार्यरत होती. तिचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचे साक्षगंध होते. या साक्षगंधासाठी कपडे खरेदी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी किरण आणि लोकेश तुमसर येथे गेले होते. कापड खरेदी करून परत जाताना नियतीने घाला घातला आणि किरण अपघातात ठार झाली. या अपघाताची माहिती होताच आई व वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घरात साक्षगंधासाठी असलेले आनंदाचे वातावरण एका क्षणात दु:खात बुडाले.
लोकेशचे बहिणीवर जिवापाड प्रेम
लोकेशचे आपल्या बहिणीवर जिवापाड प्रेम होते. अपघातानंतर डोळ्यादेखत बहीण मृत्युमुखी पडल्याचे पाहून त्याने दु:खाच्या भरात उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी जवळ असलेल्या नागरिकांनी त्याला वेळीच रोखले. लोकेशची अग्निवीर योजनेतून सैन्य दलात निवड झाली असून, तो लवकरच सैन्य दलात दाखल होणार होता.