बहीण जावयाचा महिला वकिलावर चाकूने हल्ला; भंडारा शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 06:02 PM2023-12-16T18:02:07+5:302023-12-16T18:02:38+5:30
धाकट्या बहिणीच्या घटस्फोटाचे प्रकरण लढत असलेल्या महिला वकीलावर तिच्या बहीण जावयाने चाकूने हल्ला केल्याने जखमी झाल्या.
देवानंद नंदेश्वर
भंडारा : धाकट्या बहिणीच्या घटस्फोटाचे प्रकरण लढत असलेल्या महिला वकीलावर तिच्या बहीण जावयाने चाकूने हल्ला केल्याने जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी ११:३० वाजताच्या समारास भंडारा शहरातील माकडे मोहल्ल्यात घडली. सरिता माकडे, असे जखमी महिला वकिलाचे नाव आहे. महेश डोकरीमारे (४२, रा. पांडे महाल जवळ, भंडारा), असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
सरिता माकडे या व्यवसायाने वकील असून त्या जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत आहेत. सरिता यांच्या बहिणीचे लग्न २०१४ झाले. मात्र काही काळानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडायला सुरवात झाली. हळूहळू दोघांमधील कौटुंबिक वाद टोकाला जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत आले. सरिता यांनी त्यांच्या बहिणीच्या बाजूने वकीलपत्र घेतले आणि केस लढायला सुरवात केली. शनिवारी, सकाळी त्याचाच राग मनात धरून त्या न्यायालयात जात असताना त्यांच्या बहिजावयाने त्यांना वाटेत रोखले. त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी महेश डोकरीमारे यांच्याविरुध्द भादंवि ३२६, ३२३, ५०४, ५१० कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास सहायक फौजदार गजानन वलथरे करीत आहे.