जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती भयावह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:04 PM2017-10-29T22:04:00+5:302017-10-29T22:04:15+5:30

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने प्रकल्पांची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.

The situation in the district is terrible | जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती भयावह

जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती भयावह

Next
ठळक मुद्दे२७ टक्के जलसाठा : उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईचे संकेत

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने प्रकल्पांची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. २८ जुने मालगुजारी तलावात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यापुर्वीच रबी हंगामातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत केवळ २७.३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाºया लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २७ टक्के पाण्याचा साठा आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ३९ टक्के जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठयात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.
सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २३, बघेडा ६.५० टक्के जलसाठा आहे. बेटेकर बोथली प्रकल्पात २८ तर, सोरणा जलाशयात २.१६ टक्के जलसाठ्याची नोंद आहे. चारही मध्यम प्रकल्पात १९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६.८६ टक्के जलसाठा शिल्लक होता.
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३२.२४ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ३०.४२ टक्के आहे. ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
अनेक भागात नळाद्वारे दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतांनाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ३३.३२९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने उन्हाळ्यापुर्वीच पाण्याचे संकट बळावणार यात तिळमात्र शंका नाही.

पावसाळ्यात केवळ ६७ टक्के पाऊस
भंडारा जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी. पाऊस पडतो. गतवर्षी २०१६ मध्ये २९ आॅक्टोबरपर्यंत ९८८.३ मि.मी. च्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा मात्र पावसाळ्याभरात आजपर्यंत केवळ ८८४.१ मि.मी. पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी १०४.२ मि.मी. पाऊस कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. एकंदरच भंडारा तालुक्यात ५५ टक्के, मोहाडी ७३, तुमसर ६२, पवनी ८५, साकोली ५६, लाखांदूर ७२ तर लाखनी तालुक्यात ६५ टक्के पावसाची नोंद आहे. अत्यल्प पावसामुळे जलसाठे निम्यापेक्षा अधिक भरले नाही. परिणामी येत्या काळात पाणीटंचाईचा सामना अनेक गावांना बसण्याची शक्यता आहे.

Web Title: The situation in the district is terrible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.