सहा तासांच्या मेगा ब्लॉकने वाहनधारक वेठीस
By admin | Published: August 2, 2015 12:51 AM2015-08-02T00:51:05+5:302015-08-02T00:51:05+5:30
रेल्वे प्रशासनाने दोन तासाऐवजी सहा तासाचा मेगाब्लॉक केला. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रात्रभर वाहतूक बंद होती.
वाहनांच्या रांगा : पहाटेपर्यंत फाटक बंद
तुमसर : रेल्वे प्रशासनाने दोन तासाऐवजी सहा तासाचा मेगाब्लॉक केला. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रात्रभर वाहतूक बंद होती. रेल्वे फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबई-हावडा मार्गावर तुमसर रोड येथे फाटक क्रमांक ५३२ आहे. शुक्रवारी रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत अप रेल्वे ट्रॅकवर मेगाब्लॉक करण्यात आले. केवळ एक ते दीड तासांचे हे काम होते. रात्री २.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत येथे मेगाब्लॉक करण्याची वेळ होती.
अप ट्रॅकची पूर्ण गिट्टी रेल्वे कर्मचाऱ्यांनी काढली. रात्री ११.३० ते पहाटे ५ पर्यंत हे फाटक रेल्वे प्रशासनाने बंद केले होते. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर दोन कि़मी. पर्यंत जड वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. लहान वाहने वाहनधारकांनी दुसऱ्या मार्गाने काढली. दक्षिण-पूर्व रेल्वेचे तुमसर रोड महत्वपूर्ण जंक्शन आहे.
१० दिवसापूर्वी डाऊन ट्रॅकचे मेगाब्लॉक येथे करण्यात आले होते. ३१ जुलैचा मेगाब्लॉक करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते. हा मेगाब्लॉक मध्यरात्री करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता, अशी माहिती आहे. परंतु रात्री ११.३० वाजता या कामाची सुरूवात झाली. रेल्वे प्रशासनाचे सुमारे ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी हे मेगाब्लॉकची कामे केली. मुख्य राज्यमार्ग तथा मुख्य रेल्वे मार्गावर इतका मोठा मेगाब्लॉक क्वचितच करण्यात येतो. केवळ अपट्रॅकचा (दोन ट्रॅक) वर हा मेगाब्लॉक होता. येथे रेल्वेच्या नियोजनाचा अभाव दिसून येतो. (तालुका प्रतिनिधी)