पालोऱ्यात अतिवृष्टीने सहा घरांची पडझड
By admin | Published: September 20, 2015 12:54 AM2015-09-20T00:54:49+5:302015-09-20T00:54:49+5:30
विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाबरोबर करडी परिसरात अतिवृष्टीचे आगमन झाले. पावसाने शेतकरी सुखावला. ....
तहसीलदारांना निवेदन : घरकुलासह नुकसान भरपाईची मागणी
करडी (पालोरा) : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाबरोबर करडी परिसरात अतिवृष्टीचे आगमन झाले. पावसाने शेतकरी सुखावला. मात्र घरादारांचे नुकसानीने त्रासदीत भरच पडली. पालोरा येथे अतिवृष्टीने सहा घरांचे नुकसान झाले. राहते घर कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्यावर बसून जीवन जगण्याची वेळ आपादग्रस्तांवर आहे. त्वरीत नुकसान भरपाई मिळण्याबरोबर घरकुल मंजूर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
पालोरा येथे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी व दुसऱ्या दिवशी सुद्धा जोरदार पाऊस झाला. पंधरा ते २० दिवसापासून बेपत्ता झालेला पाऊस एकदम धो धो कोसळला. या पावसाने शेती पिकण्याचा १०० टक्के हमी मिळाली तर दुसरीकडे १०० टक्के नागरिकांचे नुकसानही झाले. सुमारे १८ तास झालेल्या अतिवृष्टीने पालोरा येथील मातीचे घरे जमीनदोस्त झालीत. कवेलू, फाटे व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. घरादारांचे नुकसान झालेल्यांमध्ये नंदकिशोर मेश्राम, संतकुमार कुंभलकर, नारायण सोनटक्के, सुगंधा बावणे, बेनू तिजारे, शाम काळे आदींच्या सहा घरांचे मोठे नुकसान झाले. नारायण सोनटक्के, नंदकिशोर मेश्राम, बेनू तिजारे, सुगंधा बावणे यांचेसह राहायला सुद्धा घर नाही. संसार उघड्यावर आलेला आहे. त्वरीत नुकसान भरपाईची व घरकुल देण्याची मागणी होत आहे. दरम्यान तलाठी पालोरा यांनी नुकसानीचा पंचनामा तयार केला असून अहवाल तहसीलदार मोहाडी यांना सादर केला आहे. (वार्ताहर)