सहा इंच उंचीची सायकल चालवणारे ‘मन्नाडे’
By Admin | Published: August 18, 2016 12:19 AM2016-08-18T00:19:05+5:302016-08-18T00:19:05+5:30
मानवी जीवनात कलेला मोलाचे स्थान आहे. आपली ऐतिहासिक सांस्कृतिक कला टिकविणे हे प्रत्येक कलावंताचे ध्येय असते.
आगळावेगळा उपक्रम: अंधश्रद्धा दूर करण्याकरिता जादूचे प्रयोग
विलास बन्सोड उसर्रा
मानवी जीवनात कलेला मोलाचे स्थान आहे. आपली ऐतिहासिक सांस्कृतिक कला टिकविणे हे प्रत्येक कलावंताचे ध्येय असते. जिद्द व चिकाटीमुळे साधारण माणूसही आगळेवेगळे प्रयोग करून दाखवितो.
३० वर्षापूर्वी एक पश्चिम बंगालचा जादूगर उसर्रा येथे जादूचे खेळ करायला आला आणि कायमचा उसर्रावासी झाला. त्यांच्या कलेतून अंधश्रद्धा दूर होण्याकरिता काही जादूचे खेळ दाखविले जातात. त्यातच सहा इंच व दीड फुट सायकल चालवून त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.
६० वर्षीय अरुणकुमार मन्नाडे असे या प्रतिभाशाली सायकलस्वार व जादू कलावंतांचे नाव आहे. त्यांचा जन्म कोलकाता येथील आलमबाजार येथे झाला. मन्नाडे यांची कौटुंबिक परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे ते फक्त इयत्ता पहिली पर्यंतच शिक्षण घेऊ शकले व वयाच्या दहा वर्षापासून देशातील सुप्रसिद्ध जादूगर ए.के. सरकार यांच्या सर्कसीत काम करू लागले.
त्यांचे वडील यावेळी पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध कमला सर्कसमध्ये काम करायचे. त्यावेळी त्यांच्या वडील सहाइंच उंच व दीड फूट लांब सायकल चालवायचे. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी ही सायकल शिकण्याचे ठरविले व त्यात ते यशस्वी झाले. मन्नाडे यांच्या मते संपूर्ण भारतात हा खेळ फक्त तेच करतात. त्यांच्या वडीलांनी ही सायकल त्यांना भेट म्हणून दिली. त्यांनी आपली स्वतंत्र सर्कस व जादूची प्रयोगशाळा काढली. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र, ओरिसा, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे विविध भागात आपले जादूचे प्रयोग व सर्कस करून प्रेक्षकांची मने जिंकली. छत्तीसगड मध्ये त्यांच्या जादूचे प्रयोग पाहण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अजित जोगींनी सुद्धा हजेरी लावली. जादूगर अरुण कुमार मन्नाडे यांचा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अजित जोगींकडून सत्कार करण्यात आला. जादूटोणा ही गोष्ट जगात कुठेही नाही. या अघोरी, अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्या यासाठी ते सदैव आपल्या जादूच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवितात. सर्कसमधल्या या कलावंताने उसर्रा येथे स्वातंत्र्य दिवशी सर्वांच्या समोर ही लहानशी सायकल चालवून दाखविली. ६० वर्षीय मन्नाडे यांनी सदर प्रयोग दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
सध्या उसर्रावासी असलेले मन्नाडे यांची परिस्थिती गंभीर आहे. कुटुंबाचे रहाटगाडगे चालविताना त्यांची दमछाक होते. मात्र अशा कलावंतांची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही ही शोकांतिका आहे. अशा प्रतिभाशाली कलावंतासाठी प्रशासनाने काही मानधन दिल्यास त्यांच्या जीवनात नवीन पहाट निर्माण होईल यात शंका नाही.