सहा व्यक्ती विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:42+5:30
भंडारा जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात अद्यापर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नाही. मात्र विदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाची करडी नजर आहे. बुधवारी एक व्यक्ती कुवैत येथून आल्याची नोंद घेण्यात आल्याने विदेशांतून आलेल्यांची संख्या अकरा झाली आहे. त्यापैकी पाच व्यक्तींना होम क्वारंटाईन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात विदेशातून आलेल्या व्यक्तींची संख्या आता अकरा झाली आहे. यापैकी सहा व्यक्ती भंडारा येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. तर पाच जण होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने खबरदारीची बाब म्हणून सर्व बीअर शॉपी, वॉईन शॉप, परमीट रुम, बार अँड रेस्टारंट, सर्व देशी दारु दुकाने, पानटपऱ्या आणि रस्त्यावरील खाद्य पदार्थ ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून शहरात याची कडक अंमलबजावणी सुरु झाली.
भंडारा जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात अद्यापर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नाही. मात्र विदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाची करडी नजर आहे. बुधवारी एक व्यक्ती कुवैत येथून आल्याची नोंद घेण्यात आल्याने विदेशांतून आलेल्यांची संख्या अकरा झाली आहे. त्यापैकी पाच व्यक्तींना होम क्वारंटाईन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर सहा व्यक्तींना भंडारा येथे तयार करण्यात आलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासनाची प्रत्येक बाबीवर करडी नजर आहे.
भंडारा जिल्ह्यातील दारु दुकानांसह पानटपºया बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. सायंकाळी पोलिसांचे वाहन शहरातील विविध मार्गावर व्यवसायीकांना याबाबत सूचना देत फिरत होते. नगरपरिषदेच्या वतीनेही कोरोना संसर्ग प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्येही विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. आठवडी बाजार आणि गुरांचा बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्ह्यातील अनेक गावचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले होते. शहरातील औषधी दुकानांमध्ये सॅनिटायझर आणि मास्क घेण्यासाठी गर्दी दिसत होती. भंडारा जिल्हा प्रशासनाने कोरोना संदर्भात विशेष उपाययोजना केल्याने नागरिकांमध्ये कुठेही भीतीचे वातावरण दिसत नाही. परंतु प्रत्येक जण काळजी घेताना दिसून येत आहे. शहरात कुठेही भीतीचे वातावरण दिसत नाही. मात्र आता व्यवसाय बंद झाल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील दारु दुकानांसह फुड स्ट्रीट बंद
कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात गुरुवार सायंकाळी ५ वाजतापासून दारु दुकानांसह फुड स्ट्रीट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले. ही बंदी ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बिअर शॉपी, वाईन शॉप, परमीट रुम, बार अँड रेस्टारंट, देशी विदेशी दारुची दुकाने, सर्व क्लब, पान-खर्रा ठेले तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाºया टपºयांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस विभागाने शहरात गस्त करून सर्व व्यवसायीकांना याबाबत सूचना दिली. सर्व व्यवसायीकांनी पटापट आपली दुकाने बंद केली. या नियमाची अंमलबजावणी न करणाºया संबंधित व्यवसायींकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर शहरातील रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
वातानुकुलीत बसेसला बंदी
भंडारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असून त्यानुसार गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व वातानुकुलीत बसेस (खासगी बसेससह) तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व बसेस निर्जंतूकीकरण करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
शासनाने शेतकरी-शेतमजुरांना सवलत द्यावी
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व व्यवहार ठप्प झाल्यासारखी परिस्थिती आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या शहरी व ग्रामीण मजूरांना बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ३१ जुलैपर्यंत वीजपुरवठा मोफत द्यावा, दरमहा चार हजार रुपये प्रमाणे प्रती कुटुंब २० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, सर्व वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर एजाज अली, मिसार बेग, यशवंत टिचकुले, मनोहर मेश्राम, संजय मते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता तक्रारी वॉटस्अॅपवर द्या
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात काम घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी व्हावी यासाठी नागरिकांनी आता आपल्या तक्रारी, निवेदने व्हॉटस्अॅपवर द्यावी असे आवाहन करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने ९३५६४८८७२५ या क्रमांकाचा व्हॉटस्अॅप कार्यान्वित केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी दिली आहे. संबंधित व्हॉटस्अॅप क्रमांकावर निवेदन अथवा तक्रार प्राप्त होताच संबंधित विभागाच्या अधीक्षकांच्या ग्रूपवर हा मॅसेज फॉरवर्ड केला जाईल आणि विभाग प्रमुखाशी चर्चा करून निवारण करण्याची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.