स्वाईन फ्ल्यूचे सहा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:32 PM2017-09-16T22:32:43+5:302017-09-16T22:33:14+5:30
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने चांगलाच हैदोस घातल्याचे समोर येत आहे. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने चांगलाच हैदोस घातल्याचे समोर येत आहे. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या आजाराने महिन्याभरात जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याला खुद्द आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.
तुमसर तालुक्यातील चांदमारा येथे स्वाईन फ्ल्यूची लागण होवून इसमाचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसातच या आजारापासून रुग्ण दगावल्याचे हळूहळू स्पष्ट होत गेले. मागील आठवड्यात जिल्हा रुग्णालयात संशयित दोन स्वाईन फ्ल्यू रुग्णांपैकी एकाला नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू आजाराने पाय रोवल्याचे लक्षात येताच रक्त तपासणी व अन्य चाचपणी करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली आहे. इन्फ्ल्युएंझा सदृष्य लक्षणे असल्यास त्वरीत जवळच्या आरोग्य संस्थेत जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले.
आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू या आजारामुळे आतापर्यंत सहा रूग्णांचा बळी गेला आहे. मागील आठवड्यात तुमसर तालुक्यात देवदर्शनाहून परत आलेल्या आणखी एका भाविकांचा मृत्यू झाला होता. संघमित्रा तुरकने (५०) रा.देवरीदेव असे मृत महिलेचे नाव होते. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संतोष माने (३६) रा.भंडारा यांचा ४ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर ५ सप्टेंबरला ईश्वरदयाल देशमुख (५०) यांचा तर ७ सप्टेंबरला निलावंती झोडे (३५) रा.चांदमारा, ८ सप्टेंबरला संघमित्रा तुरकने या महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर अजुन दोघांचा मृत्यू झाला.
सर्वच रुग्णालयात उपचार
स्वाईन फ्लू आजाराची साथ सध्या जिल्हयात आढळून येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू या रोगावर उपचार करण्यात येत असून स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हयातील सामान्य रुग्णालय भंडारा व उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे इन्फ्ल्युएंझा करीता विशेष तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे इन्फ्ल्युएंझा आजाराच्या रुग्णांना भरती करण्याकरीता विशेष अलगीकरण कक्ष स्थापित करण्यात आले असून तेथे रुग्णांचे गळयाचे स्वॅब नमुने तपासणी करीता गोळा करुन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. स्वाईन फ्ल्यु उपचाराकरीता लागणारे आॅसेल्टामीवीर (टॅमीफ्ल्यू) औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे.
संशयित रुग्णांची तपासणी
जिल्हयामध्ये आरोग्य विभागामार्फत ६७६ संशयित इन्फ्ल्युएंझा रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून २१ रुग्णांना उपचाराकीरता शासकीय रुग्णालयात व १२ रुग्णांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या रुग्णांपैकी १३ रुग्णांचे स्वॅब नमुने इन्फ्ल्युएंझा आजाराकरिता दूषित आढळल्याची माहितीही जिल्हा आरोग्य प्रशासनाने उघड केली आहे.