सहा हजार ज्योती कलशांची स्थापना होणार
By admin | Published: September 30, 2016 12:42 AM2016-09-30T00:42:04+5:302016-09-30T00:42:04+5:30
शक्तीस्वरूपा आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून (१ आॅक्टोबर) सुरूवात होत आहे़ जिल्हाभरात देवीच्या
तयारी नवरात्रौत्सवाची : ३५३ ठिकाणी सार्वजनिक मंडळातर्फे दुर्गास्थापना
इंद्रपाल कटकवार भंडारा
शक्तीस्वरूपा आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून (१ आॅक्टोबर) सुरूवात होत आहे़ जिल्हाभरात देवीच्या जागृत व पवित्र मंदिरात जवळपास सहा हजार ज्योतीकलशांची स्थापना शनिवारी केली जाणार आहे़ दांडीया, गरबा, भजन, किर्तन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आगामी १० दिवसात भाविकांना पहावयास मिळणार आहे़
हिंदू संस्कृतीत कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या माता दुर्गा व तिच्या नऊ रुपांच्या दर्शनाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात़ चैत्र व अश्विन महिन्यात माँ दुर्गेची आराधना करण्यात येते़ त्यात अश्विन महिन्यात करण्यात येणाऱ्या मातेच्या भक्तीला ‘अनन्यसाधारण भक्ती’ असे म्हणतात़ हे पावन नऊ दिवस असंख्य भाविक मातेच्या चरणी अक्षरक्ष: लोटांगण घालतात़
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अधुनमधुन पाऊस बरसत असला तरी भक्तांच्या जोषात किंचितही फरक पडला नाही. दोन दिवसांपासून नवरात्र उत्सवाच्या तयारीला अधिक जोर आला आहे़ जिल्ह्यात ३५३ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे माँ दुर्गा तर २३१ ठिकाणी माँ शारदाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ यावेळी संपूर्ण शहरासह जिल्हा रोषनाईने न्हावून निघणार आहे़ शहरात विविध ठिकाणी भव्य शामियाना उभारण्याचे काम अंतिम टप्यात आहेत. मुर्तीकारही दुर्गामातेच्या मातीच्या प्रतिमांवर अखेरचा हात फिरवित आहेत.
जिल्ह्यातील प्रसिद्ध मोहाडी स्थित माँ चौण्डेश्वरी मंदिर, आदीशक्ती शितला माता मंदिर भंडारा, आई तुळजाभवानी मंदिर , माता अंबाई-निंबाई मंदिर, कोरंभी येथील माता पिंगलेश्वरी देवस्थान, अन्नपूर्णा माता मंदिर भंडारा, बडा बाजार स्थित हनुमान मंदिर, यासह जिल्ह्यात अन्य ठिकाणी जवळपास सहा हजार ज्योती कलशांची स्थापना करण्यात येणार आहे़ घरगुती घटांचीही स्थापना केली जाणार आहे.