सहा वर्षांत एचआयव्हीने ३ हजार ६१७ जण बाधित
By admin | Published: December 1, 2015 05:07 AM2015-12-01T05:07:33+5:302015-12-01T05:07:33+5:30
जिल्ह्यात २००९ पासून एआरटी केंद्र सुरु करण्यात आले. तेव्हापासून ३ हजार ६१७ एड्स बाधित रुग्णांची संख्या आहे़ एड्स
आज जागतिक एड्स दिन : पाच ठिकाणांहून औषधोपचार
देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारा
जिल्ह्यात २००९ पासून एआरटी केंद्र सुरु करण्यात आले. तेव्हापासून ३ हजार ६१७ एड्स बाधित रुग्णांची संख्या आहे़ एड्स प्रतिबंधात्मक कार्यक्रमाच्या जनजागृतीमुळे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे़ बाधित रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यात पाच ठिकाणी लिंक एआरटी केंद्रातून औषधोपचार मिळत आहे.
दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन पाळण्यात येतो. या भयावह आजाराच्या जनजागृतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शुन्य गाठायचा आहे’ (गेटींग टू झिरो) असा आहे. याचा अर्थ यापुढे नविन एचआयव्ही संसर्ग होऊ देणार नाही, कलंक भेदभाव शुन्यावर आणणे, एड्सने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे असा आहे. राज्यामध्ये एचआयव्ही संसर्ग व एड्सचे प्रमाण कमी व प्रतिबंध करण्यासाठी सन २००२ पासून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऐच्छिक चाचणी व सल्ला केंद्र यांच्यासह अनेक संस्था कार्यरत आहेत. सन २००२ एचआयव्हीची चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या ६२६ होती. आॅक्टोबर २०१४ पर्यंत ही आकडेवारी २४ हजार ७८६ एवढी वाढली. सन २००२ मध्ये १३६, २००३ मध्ये १७२, २००४ मध्ये २०४, २००५ मध्ये २४३, सन २००६ मध्ये २८६, सन २००७ मध्ये ५४१, २००८ मध्ये ५७९, २००९ मध्ये ६९६, २०१० मध्ये ६२४, २०११ मध्ये ५८३, २०१२ मध्ये ३३१, तर आॅक्टोबर २०१३ मध्ये २४८, २०१४ मध्ये २५० तर आॅक्टोंबर २०१५ पर्यंत १७५ रुग्ण हे एड्सग्रस्त आहे.
शासनाने गर्भवती मातांची एचआयव्हीची चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे ही माहिती उघडकीस येत आहे. सन २००३ मध्ये एचआयव्हीची ९७० महिलांनी तपासणी केली होती. त्यावेळी १२ महिलांमध्ये एड्सचा आजार आढळून आला. याप्रमाणेच सन २००४ मध्ये ३,१४५ महिलांच्या तपासणीत २३, २००५ मध्ये ४२, २००६ मध्ये ३३, २००७ मध्ये ९२, २००८ मध्ये ६६, सन २००९ मध्ये ८२, २०१० मध्ये ६५ , २०११ मध्ये ५२, २०१२ मध्ये २३, २०१३ मध्ये २१ , २०१४ मध्ये १९ तर आॅक्टोंबर २०१५ पर्यंत १५ महिलांमध्ये एड्स आजार असल्याचे आढळून आले आहे.