आभाळ कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:53+5:30
जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात सर्वाधिक २५४.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. पाणी आसपासच्या शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सर्वदूर आभाळ कोसळल्यासारखा पाऊस बसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला असून नदी, नाल्यांना पूर येवून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली. साकोली तालुक्यातील बोदरा तलावाची पाळ फुटल्याने परिसरातील शेती जलमय झाली होती.
जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात सर्वाधिक २५४.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. पाणी आसपासच्या शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मासेमारांचेही मोठे नुकसान झाले. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावर फुटभर पाणी दिवसभर साचून होते. त्यामुहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली. तुमसर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुराने येरली रस्ता बंद झाला होता. या पुलावरून तीन फूट पाणी वाहत होती. लाखनी तालुक्यात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. लाखनी शहरातील काही भाग पूर्णत: जलमय झाल्याचे दिसत होते. पवनी, लाखांदूर, मोहाडी तालुक्यालाही या पावसाचा जबर फटका बसला. लाखनी तालुक्यातील मºहेगाव येथील पूलावरून पाणी वाहत होते.
भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड, गौतमबुद्ध वॉर्ड, खात रोडवरील रूख्मिनीनगर आदी परिसरातील घरांची पडझड झाली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
(अधिक वृत्त पान २ वर)
नाल्याच्या पुरात इसम वाहून गेला
करडी (पालोरा) : नाला पार करताना ६२ वर्षीय इसम वाहून गेल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. गोविंदा वारलू गोबाडे (६२) असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. जांभोरा येथील पुलाजवळील खोल पाण्यातून गावाकडे जात असताना पायातील चप्पल निघाली. ती चप्पल पकडण्यासाठी तो गेला असता खोल पाण्यात तोल जावून सरळ वाहत गेला. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शोध मोहिम सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर थांगपत्ता लागला नव्हता.
गत २४ तासात १६३.१ मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात गत २४ तासात १६३.१ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात ९३९.३ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक पाऊस साकोलीत २५४.४ मिमी, लाखनी २०१.८ मिमी, मोहाडी १८०.६ मिमी, भंडारा १७५.० मिमी, तुमसर १५३.० मिमी, लाखांदूर ९९.४ मिमी आणि पवनी तालुक्यात ७७.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष सरासरी पाऊस ९१८.८ मिमी आवश्यक असतो. जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत ९१८.६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात पडणाºया पावसाच्या सरासरी १०२ टक्के म्हणजे ९३९.३ मिमी पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे.