मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:12+5:302021-01-24T04:17:12+5:30
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे ...
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रम साधण्याची सुवर्ण संधी मार्टिन ग्रुपतर्फे उपलब्ध करून दिली आहे. भारतातील १००० बाल वैज्ञानिकांद्वारे एकाच वेळी १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्रातील ३६० बाल वैज्ञानिकांमध्ये मांडवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब कुटुंबातील प्रज्ञावंत व होतकरू असे ५ वी ते ७ वीच्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले आहे. १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास आचल बुराडे, प्रज्वल बुराडे, वेदिका ढबाले, राणू मते, योगेश्वरी ढबाले, समीक्षा ढबाले, खुशबू ढबाले, साक्षी ढबाले, अंशूल टांगले तसेच तुमसरच्या जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे, या दहाही विद्यार्थ्यांना ‘राइस सिटी तुमसर’ नावाच्या गटाने हजर ठेवण्यासाठी तसेच पालकांना व शाळा प्रशासनास सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती देऊन चर्चा करण्यासाठी शुक्रवारी शाळेत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टिन ग्रुप याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, शिक्षक दामोधर डहाळे, पालक शिवशंकर ढबाले, भारत ढबाले, दुर्वास टांगले, रामकिसन बुराडे, कैलास मते उपस्थित होते.